वृत्तसंस्था, चेन्नई
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पुढील हंगामासाठीच्या लिलावापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कर्णधार संजू सॅमसनने राजस्थान सोडण्याची इच्छा व्यक्त केली असून पाच वेळचा ‘आयपीएल’ विजेता संघ चेन्नई सुपर किंग्जने त्याला करारबद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. मात्र, राजस्थान संघाने सॅमसनबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी माहिती आहे.
राजस्थान रॉयल्सने गेल्या वर्षी सॅमसनला १८ कोटी रुपये देत संघात कायम ठेवले होते. मात्र, गेल्या काही काळापासून राजस्थान संघाचे व्यवस्थापन आणि सॅमसन यांच्यातील संबंध बिघडल्याची चर्चा आहे. आता सॅमसनला आपल्याकडूनच खेळायला लावायचे की संघमुक्त करायचे की अन्य एखाद्या संघातील खेळाडूबरोबर त्याची अदलाबदल (ट्रेड) करायची, अशा विविध पर्यायांचा राजस्थान संघाकडून विचार केला जात आहे.‘आयपीएल’च्या नियमांनुसार, करारबद्ध खेळाडूंबाबत निर्णय घेताना सर्व ताकद ही फ्रँचायझींकडेच असते. सॅमसन आणखी दोन वर्षांसाठी राजस्थान संघाशी करारबद्ध आहे. त्यामुळे राजस्थानने त्याला संघमुक्त करण्यास किंवा अन्य एखाद्या संघाकडे पाठविण्यास नकार दिला, तर सॅमसनला पुढील वर्षीही या संघाचे प्रतिनिधित्व करावे लागेल.
या सगळ्या घडामोडींवर चेन्नई सुपर किंग्ज संघ बारीक लक्ष ठेवून आहे. चेन्नई संघाने यापूर्वीच सॅमसनला करारबद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली असून त्याच्याकडे महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, ‘आयपीएल’चा गेला हंगाम संपल्यानंतर सॅमसनने चेन्नई संघाचे व्यवस्थापन आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची अमेरिकेत भेटही घेतली होती. चेन्नईचा संघ सॅमसनला करारबद्ध करण्यास उत्सुक असला, तरी त्यांची आपल्या संघातील खेळाडूंना राजस्थानकडे (ट्रेड) पाठविण्याची तयारी नाही. राजस्थानने ३० वर्षीय सॅमसनच्या बदल्यात दोन खेळाडूंची मागणी केल्याचे समजते.आता राजस्थानचे व्यवस्थापन आणि सॅमसन यांच्यातील मतभेद दूर न झाल्यास, तसेच चेन्नईने आपल्या संघातील अन्य खेळाडूंशी सॅमसनची अदलाबदल करण्यास नकार दिल्यास, अखेर त्याला संघमुक्त करून १८ कोटी रुपये वाचवणे हाच पर्याय राजस्थानसमोर शिल्लक राहू शकेल.
कोलकाताशी स्पर्धा
चेन्नईप्रमाणेच कोलकाता नाइट रायडर्स संघही सॅमसनला करारबद्ध करण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. कोलकाताचा संघ अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज, तसेच कर्णधाराच्या शोधात आहे. गेल्या वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवले होते. मात्र, त्यानंतर श्रेयसला संघमुक्त करण्यात आले आणि या वर्षी झालेल्या हंगामात अजिंक्य रहाणेने कर्णधारपद सांभाळले. मात्र, कोलकाता संघाला ‘प्ले-ऑफ’ही गाठता आले नाही. कोलकाता संघाने गेल्या वर्षीही सॅमसनला करारबद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना यश मिळाले आहे. यंदा नव्याने प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे.
फारकत का?
भारताच्या ट्वेन्टी-२० संघाप्रमाणेच राजस्थानकडूनही सलामीला खेळण्यास सॅमसन उत्सुक होता. मात्र, गेल्या हंगामाच्या सुरुवातीला त्याला दुखापत झाली आणि राजस्थानने यशस्वी जैस्वालच्या साथीने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला सलामीला खेळवले. सूर्यवंशीने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे दुखापतीतून सावरून पुनरागमन झाल्यावर सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर खेळणे भाग पडले. तसेच अन्यही काही गोष्टींवरून सॅमसन आणि राजस्थानच्या व्यवस्थापनात मतभेद निर्माण झाले. त्यामुळेच २०१३ साली ज्या संघाकडून ‘आयपीएल’ पदार्पण केले, त्या राजस्थान संघापासून फारकत घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
अश्विनबाबतही चर्चा
अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन चेन्नई सुपर किंग्जला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. पुढील हंगामासाठी संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी अद्याप दोन महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ कोणताही निर्णय घेण्याची घाई करणार नसल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. ‘‘लिलावापूर्वी आम्ही खेळाडूंशी चर्चा करतो आणि अश्विनही त्याचाच भाग आहे. पुढील हंगामात आपली भूमिका काय असणार हे जाणून घेण्यास अश्विन इच्छुक आहे,’’ असे ‘आयपीएल’मधील सूत्राने सांगितले. गेल्या हंगामापूर्वीच्या खेळाडू लिलावात चेन्नईने ९.७५ कोटी रुपयांत अश्विनला करारबद्ध केले होते. अश्विनचे दशकभरानंतर चेन्नई संघात पुनरागमन झाले. याआधी तो २००९ आणि २०१५ या कालावधीत चेन्नई संघाकडून खेळला होता.