एक्स्प्रेस वृत्त
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांत खेळाडू अदलाबदलीवरून चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. यानुसार यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन राजस्थानकडून चेन्नईकडे, तर अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा चेन्नईकडून राजस्थानकडे जाईल. या करारावर अद्याप स्वाक्षरी करण्यात आलेली नसली, तरी दोन संघांमधील चर्चा अंतिम टप्प्यावर असल्याचे समजते.
‘आयपीएल’चा गेला हंगाम संपल्यापासूनच सॅमसन राजस्थान संघ सोडण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. सॅमसन आणि राजस्थानचे व्यवस्थापन यांच्यात काही मुद्द्यांवरून मतभेद होता. या वर्षी अमेरिकेतील ‘मेजर लीग’ ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरू असताना सॅमसनने चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनातील व्यक्तींची भेटही घेतली होती. तेव्हापासून सॅमसन चेन्नई संघात जाण्यासाठी उत्सुक असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. ‘आयपीएल’च्या नव्या हंगामासाठी संघात कायम ठेवलेल्या आणि संघमुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे १५ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहेत. त्याआधी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणे अपेक्षित आहे. मात्र, सॅमसनला समाविष्ट करून घेताना चेन्नई सुपर किंग्ज संघ महेंद्रसिंह धोनीबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सॅमसनकडे ४४ वर्षीय धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. परंतु धोनी आणखी एक हंगाम खेळेल अशी आपल्याला आशा असल्याचे चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. मात्र, आता सॅमसनला करारबद्ध करण्यात यश आल्यास धोनीबाबतच्या योजनेत बदल होऊ शकेल.
आणखी एक खेळाडू?
सॅमसनच्या जागी जडेजा राजस्थानकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु ३६ वर्षीय जडेजा कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यावर असल्याचे अधोरेखित करताना राजस्थानने चेन्नईकडे आणखी एका खेळाडूची मागणी केली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनला राजस्थानकडे पाठविण्याची चेन्नईने तयारी दर्शवली आहे. परंतु राजस्थानने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाबाबत विचारणा केली आहे. पथिरानाने गेल्या दोन हंगामात चेन्नईकडून चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ त्याला सोडण्यासाठी इच्छुक नाही. अशात करनला समाविष्ट करून घेण्यास राजस्थान सहमती दर्शविणार का, यावर सॅमसन आणि जडेजा यांची अदलाबदल अवलंबून असू शकते.
दोन्ही खेळाडूंसाठी समान रक्कम
गेल्या ‘आयपीएल’ लिलावापूर्वी राजस्थानने सॅमसनला आणि चेन्नईने जडेजाला प्रत्येकी १८ कोटी रुपये देत संघात कायम ठेवले होते. दोन्ही खेळाडूंसाठी समान रक्कम देण्यात आल्याने आता त्यांची अदलाबदल करणे दोन्ही संघांना सोपे जाणार आहे.
राजस्थान रॉयल्सशी चर्चा करण्यापूर्वी चेन्नईने जडेजाचे मत जाणून घेतले होते. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विद्यमान कर्णधार ऋतुराज गायकवाड, प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि व्यवस्थापनातील अन्य सदस्यांनी मिळून जडेजाशी चर्चा केली. जडेजाने राजस्थानकडे जाण्यास आपली हरकत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर चेन्नई आणि राजस्थान संघांतील पुढील संवाद सुरू झाला.
राजस्थानचा संघ प्रतिभावंत फिरकी गोलंदाजाच्या शोधात होता. ते जडेजाबाबत आधीपासूनच विचार करत होते. सॅमसनच्या जागी जडेजाला संघात समाविष्ट करून घेण्याचा पर्याय खुला झाल्यानंतर त्यांनी त्वरित याबाबत चर्चा सुरू केली. जडेजाने आपले ‘आयपीएल’ पदार्पण राजस्थान संघाकडूनच केले होते.
