पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान संघाच्या सध्याच्या निवड धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता कोणत्याही खेळाडूला राष्ट्रीय संघाकडून खेळणे सोपे झाले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये किमान दोन हंगाम घालवल्यानंतरच खेळाडूंना संघात संधी दिली पाहिजे, असे आफ्रिदीने सांगितले.

एका कार्यक्रमात आफ्रिदीने कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी राष्ट्रीय संघ निवडण्याच्या धोरणावर कटाक्ष टाकला. तो म्हणाला, ”आज देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही सामने खेळल्यानंतर राष्ट्रीय संघात थेट खेळाडूंची निवड केली जात आहे. परंतु ते संघात जितक्या वेगाने येतात, तितक्या वेगाने अदृश्य होतात. या कारणास्तव पाकिस्तान संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे.

आफ्रिदी पुढे म्हणाला, ”भूतकाळात राष्ट्रीय संघात स्थान मिळविणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न होते. पण आता तसे झाले नाही. देशांतर्गत क्रिकेटमधील काही सामन्यांच्या कामगिरीच्या जोरावर खेळाडू पाकिस्तान संघाचे तिकीट मिळवत आहेत. निवड धोरणात बदल झाला पाहिजे आणि घरगुती क्रिकेटमध्ये दोन-तीन हंगाम घालवल्यानंतरच एखाद्या खेळाडूला राष्ट्रीय संघात घेण्याचा विचार करावा लागेल. एखादा खेळाडू घरगुती क्रिकेटमध्ये किंवा पीएसएलच्या काही सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करतो आणि त्या आधारावर त्याला पाकिस्तान संघात संधी मिळते. ही पद्धत योग्य नाही.”

हेही वाचा – एका युगाचा अंत..! दिग्गज हॉकीपटू केशवचंद्र दत्त कालवश

केवळ एक-दोन सामन्यांमध्ये खराब कामगिरीच्या जोरावर कोणत्याही खेळाडूला संघातून वगळता येऊ नये, अला सल्लाही आफ्रिदीने निवड समिती आणि प्रशिक्षकांना दिला. आफ्रिदी ”जर तुम्ही एखाद्या खेळाडूला संधी दिली आणि तो कामगिरी करत नसेल तर त्याला पुन्हा घरगुती क्रिकेटमध्ये पाठवावे. पाकिस्तानकडून खेळणे इतके सोपे करू नका. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मूल्य माहीत असले पाहिजे. मी फक्त एक किंवा दोन सामन्यांच्या जोरावर संघात संधी मिळविणाऱ्या खेळाडूंविरूद्ध आहे”, असे आफ्रिदीने सांगितले.