Shardul Thakur, Duleep Trophy: येत्या काही दिवसात दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर आता संघाच्या कर्णधारांची देखील घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत ४ झोनचे संघ खेळताना दिसणार आहेत. आगामी हंगामासाठी वेस्ट झोन संघाच्या नेतृत्वाची धुरा शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आली आहे. यासह अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासारख्या अनुभवी खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
दुलीप ट्ऱॉफी स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांना संधी देण्यात आली आहे. श्रेयस अय्यर संघात असतानाही या संघाची जबाबदारी शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासारखे अनुभवी खेळाडू या संघाचे भाग होते. पण आगामी हंगामासाठी त्यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे या दोघांची कारकिर्द संपली आहे का? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.
श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वालसह विस्टोटक फलंदाज सरफराज खान, ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे यांना या संघात स्थान देण्यात आलं आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धा ही देशांतर्गत क्रिकेटमधील मोठ्या स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेला येत्या २८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना नॉर्थ झोन आणि इस्ट झोन या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. यावेळी ही स्पर्धा कसोटी फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.
तिलक वर्माकडे साऊथ झोन संघाची जबाबदारी
या स्पर्धेसाठी साऊथ झोन संघाची जबाबदारी तिलक वर्माकडे सोपवण्यात आली आहे. या संघात साई किशोर, देवदत्त पडिक्कलसारख्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.
या स्पर्धेसाठी असा आहे साऊथ झोनचा संघ: तिलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अजहरुद्दीन (उपकर्णधार,यष्टीरक्षक), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, टी विजय, आर साई किशोर, तनय त्यागराजन, मोहित काले, सलमान निजार, एन जगदीसन (यष्टीरक्षक), विशाक विजयकुमार, एमडी निधिश, रिकी भुई, बासिल एनपी, गुरजापनीत सिंग, स्नेहल कोथंकर.
असा आहे वेस्ट झोनचा संघ: शार्दुल ठाकुर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड़, तुषार देशपांडे.