पीटीआय, नवी दिल्ली

भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरच्या पाठीवर परदेशात शस्त्रक्रिया होणार असून त्यामुळे त्याला इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) संपूर्ण हंगाम आणि त्यानंतर होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कसोटीच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याला मुकावे लागणार आहे.पाठीवरील शस्त्रक्रियेनंतर श्रेयसला साधारण पाच महिने मैदानाबाहेर राहावे लागू शकेल, अशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळामधील (बीसीसीआय) सूत्रांची माहिती आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्याच्या उपलब्धतेबाबतही साशंकता आहे. ‘‘श्रेयसच्या पाठीवर परदेशात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे,’’ असे ‘बीसीसीआय’मधील सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘आयपीएल’मध्ये श्रेयस कोलकाता नाइट रायडर्स संघाचे नेतृत्व करणार होता. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे त्याला आधी ‘आयपीएल’च्या पूर्वार्धाला मुकावे लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता त्याची दुखापत गंभीर असल्याने तो संपूर्ण हंगामालाच मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत नितीश राणा कोलकाता संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघ ७ जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘डब्ल्यूटीसी’चा अंतिम सामना खेळणार आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणाऱ्या या सामन्यात भारताला श्रेयसविनाच खेळावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेयसला गेल्या काही काळापासून पाठीच्या दुखापतीने सतावले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेश येथे झालेल्या मालिकेत श्रेयसच्या पाठीला सर्वप्रथम दुखापत झाली. त्यानंतर या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याने श्रेयसला गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला व चौथा कसोटी सामना, तसेच एकदिवसीय मालिकेला मुकावे लागले.