Team India ODI Captain For Australia Tour: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिकेसाठी रवाना होणार आहे. या मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान कसोटी संघाचा कर्णधार आणि टी-२० संघाचा उपकर्णधार असलेल्या शुबमन गिलकडे भारतीय वनडे संघाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही भारतीय वनडे संघाचा भाग असण्याची शक्यता आहे.
इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी गिलकडे कसोटी संघाची जबाबदारी सोपवली गेली होती. भारतीय संघ २०२७ मध्ये आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही स्पर्धा लक्षात घेता हा निर्णय घेतला जात असल्याचं म्हटलं जात आहे. २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. निवडकर्त्यांनी कसोटी गिलसोबत याबाबत चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे.
विराट कोहली- रोहित शर्मा खेळणार का?
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही वनडे संघाचा भाग असतील, अशी माहिती समोर येत आहे. दोघेही गेल्या ८ महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. न्यूझीलंडविरूद्ध झालेला चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना हा दोघांचाही शेवटचा वनडे सामना होता. या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने जेतेपदाचा मान पटकावला होता. आता दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुनरागमन करताना दिसू शकतात.
इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कसोटी संघाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली होती. इंग्लंडचा दौरा हा कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच दौरा होता. या दौऱ्यावर त्याने फलंदाजी करताना ४ शतकं झळकावली होती. त्याने ७५.४० च्या सरासरीने धावा करताना ७५४ धावा केल्या होत्या. ही मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त झाली होती. कसोटीसह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही गिलकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशिया चषकासाठी त्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती.