भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उत्कृष्टता केंद्रात दाखल झाले आहेत. आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईला रवाना होण्यापूर्वी जसप्रीत बुमरा, यशस्वी जैस्वालसह या दोघांच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन केले जाणार आहे. भारतीय संघ स्पर्धेसाठी ४ सप्टेंबर रोजी दुबईत दाखल होणार आहे. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी भारताची संयुक्त अरब अमिराती संघाशी गाठ पडणार आहे.

उत्कृष्टता केंद्रात तंदुरुस्तीच्या मूल्यांकनाबरोबर सरावदेखील घेतला जाणार आहे. गिल फ्लूच्या आजारामुळे दुलीप करंडक स्पर्धेत खेळू शकला नव्हता. गिल बंगळूरु येथूनच दुबईला रवाना होईल. या वेळी भारताचा एकत्रित संघ रवाना होणार नसून, सर्व खेळाडू आपापल्या ठिकाणाहून रवाना होणार आहेत.

गिल, रोहितबरोबर बुमरा, जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर हेदेखील हंगामापूर्वी आवश्यक असलेल्या तंदुरुस्ती मूल्यांकनासाठी येथे दाखल झाले आहेत. अर्शदीप सिंग, हर्षित राणा (उत्तर विभाग) आणि कुलदीप यादव (मध्य विभाग) हे दुलीप करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळत आहेत.

दरम्यान, दुलीप करंडक स्पर्धेसाठी पूर्व विभागाला मुकेश कुमार जायबंदी झाल्याचा धक्का बसला आहे. दुलीप करंडकच्या सामन्यात मुकेश कुमार पहिल्याच डावात गोलंदाजी करू शकला. पहिल्या डावात मांडीच्या दुखापतीमुळे नऊ षटके गोलंदाजी करू शकला नाही. त्यानंतर त्याने फलंदाजी केली. मात्र, दुसऱ्या डावात तो मैदानातही उतरला नाही.