IND vs NZ Match Records In ICC: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने चार सामन्यांत चार विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश सारख्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून आता भारत वर्ल्डकप २०२३ च्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पण आता आगामी सामन्यात रोहित शर्माच्या संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. रविवारी धर्मशाला येथे पॉईंट टेबलमधील सर्वोच्च पदावर असणाऱ्या न्यूझीलंडसह भारताचा सामना होईल. किवी टीम इंडियासाठी केवळ विश्वचषकच नव्हे, तर संपूर्ण आयसीसी स्पर्धांमध्ये एक सर्वात मोठे आव्हान सिद्ध झाली आहे. 5-0 असा अभूतपूर्व विजय असणाऱ्या न्यूझीलंडला २००३ च्या विश्वचषकापासून भारताने एकदाही हरवलेले नाही,
बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर आता भारताकडे न्यूझीलंडचे आव्हान पेलण्यासाठी थोडा वेळ आहे पण अशातच हार्दिक पांड्यासारखा अष्टपैलू संघातून बाहेर पडल्याने अडचण वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी रविवारच्या सामन्यासाठी तयार होत असताना शुबमन गिल आणि रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. गिलने कर्णधार शर्माला विचारले की, न्यूझीलंडविरुद्ध भारताला नकोसा पराभवाचा रेकॉर्ड ब्रेक करता येईल का, यावर रोहित शर्माचं उत्तर काही प्रमाणात चाहत्यांची चिंता वाढवत आहे.
शुबमन गिलने रोहित शर्माला पेचात टाकणारा प्रश्न केला आणि..
गिल: पत्रकार परिषदेत मला कोणीतरी विचारले की २००३ पासून आपण आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडला हरवलेले नाही…
रोहित : खरं आहे. पण आपण सध्या उत्तम क्रिकेट खेळत आहोत आणि आता आपल्या बाजूने आपण तोच फॉर्म टिकवण्याचा प्रयत्न करू शकतो.
गिल: रविवारी आपल्यालान्यूझीलंडविरुद्ध नकोसा पराभवाचा रेकॉर्ड ब्रेक करता येईल का?
रोहित: बघ, आपला संघ कुठल्याही पद्धतीची हमी (गॅरन्टी) देऊन सामना खेळत नाही. आपण मैदानावर पोहोचल्यावर, एक संघ म्हणून जे करू शकतोय ते सगळंच आपल्याला करायचं आहे आणि आपण करणार आहोत. फक्त आपण फार पुढचा विचार करू शकत नाही. यापूर्वी आपल्या बाजूने निकाल लागला नसला तरी आता.. (यानंतर गिलने दुसरा प्रश्न विचारून रोहित शर्माला मध्येच थांबवले)
भारत विरुद्ध न्यूझीलंड, रेकॉर्ड काय सांगतात?
दरम्यान, भारताने यापूर्वी जेव्हा आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव केला होता, तेव्हा एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नव्हते. रोहित आणि विराट कोहली अगदी किशोरवयात होते. महत्त्वाचे म्हणजे न्यूझीलंडविरुद्धचे शेवटचे काही सामने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. कारण २०२९ मध्ये सुद्धा २०१९ विश्वचषक स्पर्धेत, पहिल्या उपांत्य फेरीत भारत किवीजकडून १८ धावांनी पराभूत झाला होता ज्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.
हे ही वाचा<< “एवढ्या पोकळ..”, सुनील गावसकर भारतीय फलंदाजावर भडकले; म्हणाले, “विराट कोहली ७०-८० वर..:
दोन वर्षांनंतर, भारताने पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे पुन्हा न्यूझीलंड भारी पडला होता. भारतातही न्यूझीलंडने बाजी मारली आहे. २०१६ च्या T20 मध्ये, वेस्ट इंडिजकडून उपांत्य फेरीतील पराभव वगळता भारताचा एकमेव पराभव न्यूझीलंडच्या हातून झाला होता. यंदाच्या स्पर्धेतही भारत व न्यूझीलंड हे दोनच संघ अपराजित आहेत त्यामुळे रविवारी होणारा सामना पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
