India vs England 2d Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंघमच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाने ४२७ धावा करत डाव घोषित केला आहे. यासह भारतीय संघाने इंग्लंडला जिंकण्यासाठी ६०८ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. भारतीय संघाकडून कर्णधार शुबमन गिलने पहिल्या डावात २६९ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने १६१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली. तर २ मोठे रेकॉर्ड करण्याची संधी त्याने गमावली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना २६९ धावांची दमदार खेळी केली. या डावात त्याला त्रिशतकी खेळी करण्याची संधी होती. पण तो बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करतानाही त्याने इंग्लंडच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दुसऱ्या डावात त्याने १६१ धावांची खेळी केली. यासह त्याने दोन्ही डावात मिळून ४०० धावा केल्या आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावा करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी कुठल्याही भारतीय फलंदाजाला एकाच कसोटी सामन्यात ४०० धावा करता आलेल्या नाहीत. याआधी एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा सुनील गावसकरांच्या नावे होता. हा रेकॉर्ड आता शुबमन गिलच्या नावे आहे. हा रेकॉर्ड मोडणं मुळीच सोपं नसणार आहे.
हे २ मोठे रेकॉर्ड मोडण्याची संधी हुकली
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना गिलने २६९ धावांची खेळी केली. पहिल्या डावात द्विशतकी खेळी केल्यानंतर त्याच्याकडे दुसऱ्या डावातही द्विशतकी खेळी करण्याची संधी होती. याआधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच घडलेलं नाही. जर गिलने अजून ३९ धावा केल्या असत्या, तर कसोटी क्रिकेटमधील दोन्ही डावात द्विशतकं झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला असता. मात्र हा मोठा रेकॉर्ड थोडक्यात हुकला.
एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड
गिलकडे एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याी संधी होती. शुबमन गिलने या डावात फलंदाजी करताना ४३० धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमधील एकाच डावात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा ग्राहम गुच यांच्या नावावर आहे. ग्रामह गुच यांनी १९९० मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर ४५६ धावा केल्या होत्या. आता गिल सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. गिलने आणखी २७ धावा केल्या असत्या तर हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला असता.
कसोटी क्रिकेटमधील एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
ग्राहम गूच विरुद्ध भारत, लॉर्ड्स, १९९०- ४५६ धावा
शुभमन गिल विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, २०२५- ४३० धावा
मार्क टेलर विरुद्ध पाकिस्तान, पेशावर, १९९८- ४२६ धावा
कुमार संगकारा विरुद्ध बांगलादेश, चटगांव, २०१४- ४२४ धावा
ब्रायन लारा विरुद्ध इंग्लंड, सेंट जॉन्स, २००४- ४०० धावा