ICC Latest Rankings Updates : पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा वनडेमधला नंबर वन फलंदाज बनला आहे. बाबरने भारतीय फलंदाज शुबमन गिलची राजवट संपवली आणि नंबर वनचा मुकुट आपल्या डोक्यावर घेतला. याशिवाय टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईकडूनही हा मुकुट गेला आहे. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद टी-२० गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी नवीनतम क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये हे बदल दिसून आले.
बाबरने ८२४ रेटिंग मिळवून एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. गिल ८१० रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. दरम्यान, टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला आदिल रशीदने मागे टाकले. इंग्लिश फिरकीपटू रशीदने ७१५ रेटिंग मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अफगाणिस्तानचा राशिद खान ६९२ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. माजी नंबर वन रवी बिश्नोई ६८५ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. या यादीतील टॉप-५ वर नजर टाकली तर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा ६७९ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि महिश तीक्षाना ६७७ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.
विराट तिसऱ्या, तर रोहित चौथ्या स्थानावर कायम –
एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत भारतीय संघाचा सुपरस्टार विराट कोहली ७७५ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. याशिवाय भारतीय कर्णधार रोहित शर्मा ७५४ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित आणि कोहली यांनी फलंदाजीने चमकदार कामगिरी केली होती. तसेच ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर ७४५ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.
आदिल आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला –
अवघ्या २४ तासांपूर्वी आयपीएल लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने त्याला विकत घेतले नसताना आदिल रशीदने टी-२० क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही आदिल रशीद अनसोल्ड राहिला. या वर्षी रशीदची मूळ किंमत २ कोटी रुपये होती, परंतु कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नाही. आदिल रशीद गेल्या मोसमात पंजाब किंग्जकडून खेळला होता. २०२१ मध्ये पंजाबने त्याला १.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते, परंतु पुढील हंगामापूर्वी रशीदला पंजाबने सोडले.