Sachin Tendulkar On Shubman Gill And Rishabh Pant: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला आहे. यामध्ये कर्णधार शुभमन गिल, सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी शतके झळकावली आहेत. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय फलंदाजांचे कौतुक करत, इंग्लंडविरुद्ध त्यांच्या डावपेचांचे सोशल मीडियावर विश्लेषण केले आहे.

भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने गिल आणि पंत यांच्या भागीदारीबाबत एक गोष्ट उघड केली. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या स्पेलदरम्यान, गिल आणि पंत हिंदीत बोलत असल्याचे त्याने निदर्शनास आणले. हिंदीत बोलण्यामागे या दोघांची कोणती रणनीती होती, हेही त्याने स्पष्ट केले आहे.

सचिनने एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “ऋषभचा पॅडल स्वीप हुकणे अपघाती नव्हते. हे त्याने जाणूनबुजून आणि अतिशय हुशारीने केले होते. शॉट खेळताना खाली वाकल्याने त्याला लेग स्लिपवर नियंत्रण ठेवून स्कूप करण्याची संधी मिळते.”

या पोस्टमध्ये सचिन पुढे म्हणाला की, “बशीरच्या स्पेलदरम्यान मला एक मनोरंजक गोष्ट लक्षात आली, शुभमन आणि पंत बशीर गोलंदाजी करत असताना हिंदीत मोठ्याने बोलत होते. हे सामान्य संभाषण नव्हते. ते दोघंही गोलंदाजाची लय तोडण्यासाठी त्याच्याशी मानसिक खेळ खेळत होते. या छोट्या छोट्या गोष्टी स्कोअरबोर्डवर दिसत नाहीत, परंतु त्यांचा सामन्यावर मोठा परिणाम होतो.”

सचिनने गिल-पंतच्या या डावपेचांचे विश्लेषण केल्यानंतर अनेक क्रिकेट चाहते त्याचे कौतुक करत आहेत. सचिनच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एक युजर म्हणाला, “म्हणूनच तुला क्रिकेटचा देव म्हटले जाते. तू ज्या पद्धतीने खेळातील सर्वात सूक्ष्म क्षणांचे निरीक्षण करतो आणि त्यांचे विश्लेषण करतो, ते एका वेगळ्याच दर्जाचे आहे.”

“देवाच्या दर्जाची निरीक्षणं! अशा प्रकारच्या विश्लेषणांसाठी तुला एक YouTube चॅनेल सुरू करण्याचा गंभीरपणे विचार करायला हवा. इथे ‘चतुर चालाक चहल ने किया, चंचल मॅक्सवेल को चलता’ असं म्हणणारे लोक स्वतःला अव्वल क्रिकेट तज्ञ समजून घेत आहेत,” अशी प्रतिक्रिया सचिनच्या पोस्टवर आणखी एका युजरने दिली.

दरम्यान या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने सर्वबाद ४७१ धावा केल्या आहेत. यामध्ये कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक १४७ धावांची खेळी केली, तर ऋषभ पंतने १३४ धावा केल्या. याचबरोबर सलामीवीर यशस्वी जस्वालने १०१ धावा केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने तीन बाद २०९ धावा केल्या आहेत. यामध्ये ऑली पोपच्या शतकाचा आणि बेन डकेटच्या अर्धशतकाचा समावेश आहे.