Shubman Gill , IND vs ENG: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यजमान इंग्लंडने आपला गड राखत लॉर्ड्सच्या मैदानावर २२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. या सामन्यातील शेवटच्या दिवशी एकटा जडेजा शेवटपर्यंत लढला. पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. दरम्यान सामन्यानंतर कर्णधार शुबमन गिलने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.
या सामन्यानंतर बोलताना शुबमन गिल म्हणाला, ” मला माझ्या संघाचा अभिमान वाटतो. शेवटच्या सत्रात आमच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. ही खरी कसोटी क्रिकेटची मजा आहे. पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात आम्हाला भागीदारीची गरज होती. इंग्लंडचा संघ आमच्यापेक्षा वरचढ होता. आमच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांकडून भागीदारीची गरज होती. पण तसं झालं नाही.चौथ्या दिवसातील शेवटचा एक तास आणि पाचव्या दिवसातील सुरूवातीचा एक तास आमच्यासाठी जड गेला. तरीदेखील आम्ही या सामन्यात संघर्ष केला.”
भारतीय संघाला सुरूवातीला मोठे धक्के बसले होते. संघातील मुख्य फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. अशा स्थितीत जडेजा फलंदाजीलाआला आणि त्याने शेवटपर्यंत एक बाजू धरून ठेवली. जडेजाने सिराज आणि बुमराहसोबत मिळून सामना जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावला. पण भारताला शेवटी नशिबाची साथ मिळाली नाही. दरम्यान ६१ धावांवर नाबाद राहिलेल्या जडेजाबद्दल बोलताना गिल म्हणाला, “जडेजाकडे खूप अनुभव आहे. त्यामुळे त्याला काही विशेष सांगण्याची गरज नव्हती. तो अप्रतिम फलंदाजी करत होता, मी फक्त त्याला आणि खालच्या फळीला टिकून राहायला सांगितलं.”
भारताचा २२ धावांनी पराभव
या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला चौथ्या दिवशी ४ मोठे धक्के बसले. यशस्वी जैस्वाल, करूण नायर, शुबमन गिल आणि नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीप स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर पाचव्या दिवशी जोफ्रा आर्चरच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या. सर्वात आधी ऋषभ पंत ९ धावांवर त्रिफळाचित होऊन माघारी परतला. त्यानंतर केएल राहुलही ३९ धावांवर माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर जडेजाने नितीश कुमार रेड्डीसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. शेवटी जडेजाने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसोबत मिळून डाव सांभाळला. शेवटी सिराजची विकेट पडल्यामुळे भारताचा संघ विजयापासून २२ धावा दूर राहिला.