Asia Cup 2022: आशिया चषकात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर २ गडी राखत दणणीत विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेने अखेर बाजी मारली. दरम्यान, या विजयानंतर अव्वल ४ मध्ये पोहोचणारा श्रीलंका हा तिसरा संघ ठरला आहे. श्रीलंकेत सुरु असणारी राजकीय अशांतता पाहता अनेक महिन्यांनंतर देशाविषयी अभिमान वाटावा असा हा विजय असल्याची भावना ट्विटरवर व्यक्त होत आहे. मात्र हे सर्व एकीकडे पण श्रीलंकेच्या विजयापेक्षा त्यांनी कालचा सामना जिंकल्यावर केलेल्या नागीण डान्सची सोशल मीडियावर हवा आहे. श्रीलंकेच्या चामिका करुणारत्नेने मैदानावर बांग्लादेशी खेळाडू व चाहत्यांच्यासमोर नागीण डान्स करून सर्वांना २०१८ मध्ये रंगलेल्या एका सामन्याची आठवण करून दिली.

खरंतर श्रीलंकेत २०१८ साली निदास ट्रॉफीच आयोजन करण्यात आलं होतं. भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघ यामध्ये सहभागी होते. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यात श्रीलंकेला दोन विकेटने पराभव पत्करावा लागला होता. यजमान श्रीलंकेला धूळ चारून बांग्लादेश थेट अंतिम फेरीत दाखल झाला. या विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानात नागीण डान्स केला होता.

आता आशिया चषकात चार वर्षानंतर श्रीलंकेने बांगलादेशला हरवून थेट अव्वल चार मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे तर आशिया चषकमधील बांग्लादेशचा प्रवास संपुष्टात आला आहे. या विजयानंतर श्रीलंकेने जुना हिशोब बरोबर करत बांगलादेशी खेळाडूंसमोर नागीण डान्स करून दाखवला आणि हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

श्रीलंकेचा नागीण डान्स

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना हा खऱ्याअर्थाने हाय- व्होल्टेज ठरला, कारण केवळ मैदानातच नव्हे तर सामन्याआधी सुद्धा दोन्ही संघांचे कोच, खेळाडूंमध्ये शाब्दीक लढाई रंगली होती.