Zhulan Goswami Mithali Raj Emotional After Holding World Cup Trophy Video: वर्षानुवर्षे सुरू असलेली प्रतिक्षा संपली आणि २ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय महिला संघ वर्ल्ड चॅम्पियन ठरला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं अन् अनेक आजी माजी खेळाडूंनी पाहिलेलं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न सत्यात उतरलं. हरमनप्रीत कौरने तो अखेरचा झेल टिपला आणि डी वाय पाटील स्टेडियमवर विजयाचा एकच जल्लोष सुरू झाला. या विजयाच्या जल्लोषात टीम इंडियाच्या माजी खेळाडूही सामील झाल्या.
कर्णधार हरमनप्रीत कौरने या दिग्गज खेळाडूंना ट्रॉफी भेट दिली आणि म्हणाली, “दीदी, ही ट्रॉफी तुमच्यासाठी आहे.” स्मृती मानधनाने यादरम्यान झुलन गोस्वामीची माफीही मागितली यानंतर स्मृती, हरमनप्रीत व झुलन गोस्वामी एकमेकींना घट्ट मिठी मारत भावुक झाल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारल्यानंतर, कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम तिच्या सहकाऱ्यांसह आनंद साजरा केला. यानंतर मैदानावर विक्ट्री लॅपदरम्यान भारतीय संघ माजी खेळाडूंना भेटला. सर्वात आधी रीमा मल्होत्राच्या हातात ट्रॉफी दिली आणि तिने हरमनबरोबर सड्डा हक एथे रख असं म्हणत आनंद साजरा केला आणि ट्रॉफी घेऊन खाली बसत संघाचे आभार मानले.
यानंतर मिताली राजच्या हातात या विश्वचषक विजयाची ट्रॉफी दिली. मिताली राज ट्रॉफी घेताना भावुक झाली. मितालीने ट्रॉफी उंचावत खेळाडूंचे आभार मानले व संघाने एकच जल्लोष केला. यानंतर हरमनप्रीत कौरने अंजुम चोप्राला मिठी मारली आणि आनंद साजरा केला. यानंतर हरमनने ही ट्रॉफी पकडत झुलन गोस्वामीला मिठी मारली आणि तिला दीदी ही ट्रॉफी हा विजय तुझ्यासाठी असल्याचं म्हटलं.
झुलन गोस्वामी हरमनप्रीतला मिठी मारत भावुक झाली आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. स्मृती मानधना तितक्यात झुलनकडे पाहत म्हणाली, सॉरी दीदी गेल्या वेळेस तुझ्यावेळेस तुझ्यासाठी वर्ल्डकप जिंकू शकलो नाही. यानंतर झुलन गोस्वामीने दोघींनाही मिठी मारली अन् भावुक झाली. सोशल मीडियावर हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मिताली राज, अंजुम चोप्रा, झुलन गोस्वामी या महिला क्रिकेटपटूंनी भारतीय महिला क्रिकेट संघाचा पाया रचला होता. अनेकदा ट्रॉफीच्या जवळ येऊन ती ट्रॉफी जिंकता आली नाही. अखेरीस भारताने ही ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
भारतीय महिला संघ चॅम्पियन झाल्यानंतर, माजी दिग्गज खेळाडू झुलन गोस्वामीने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, “हे माझं स्वप्न होतं आणि तुम्ही ते सत्यात उतरवलं. शफाली वर्माच्या ७० धावा आणि दोन मोठ्या विकेट्स, दीप्ती शर्माचं अर्धशतक आणि पाच विकेट्स… दोन्हीही अद्भुत. आता ट्रॉफी आपली आहे.”
