scorecardresearch

Women’s T20 World Cup: स्मृती मंधानाच्या झंझावाती खेळीने लावली विक्रमांची रांग; महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ‘हे’ घडले

Smriti Mandhana Records: स्मृती मंधानाने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ मध्ये सलग दुसरे अर्धशतक झळकावले. इंग्लंडपाठोपाठ तिने आयर्लंडविरुद्धही धुमाकूळ घातला. ज्यामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली

Smriti Mandhana's innings set a series of records
स्मृती मंधाना (फोटो-ट्विटर)

टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मंधानाचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात तिने आणखी एक अर्धशतक झळकावले आहे. मंधानाने सोमवारी आयर्लंडविरुद्ध ५६ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर तिने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

१..स्मृती मंधानाचे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे २२ वे अर्धशतक आहे.

२.महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून मंधानाच्या नावावर सर्वात मोठ्या खेळीचा विक्रम नोंदवला गेला आहे. तिने स्वतःचाच विक्रम मोडला. मंधानाने यापूर्वी २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ८६ आणि २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८३ धावा केल्या होत्या.

३.दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारी मंधाना भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी हा विक्रम माजी कर्णधार मिताली राजच्या नावावर होता, जिने २०१८ मध्ये नाबाद ७६ धावा केल्या होत्या.

४.महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने प्रथमच दोन ५०+ भागीदारी केल्या. मंधानाने शफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची आणि हरमनप्रीत कौरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. महिला टी-२० विश्वातील एका सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या विकेटसाठी ५०+ भागीदारी करणारा भारत हा दुसरा संघ ठरला आहे. भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाने २०१४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

५.स्मृती मंधाना ही महिला टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डेव्हिल्स नंबर (८७) वर बाद होणारी पहिली खेळाडू ठरली आहे. शतक गाठण्यासाठी १३ धावा कमी असल्याने हा एक अशुभ स्कोअर मानला जातो. विशेष म्हणजे, मंधानाने या अगोदर तिच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ८० चा टप्पा दोनदा ओलांडला होता. पण या क्रमांकावर ती कधीच पॅव्हेलियनमध्ये परतली नाही.

हेही वाचा – Virat Kohli Scared: क्रिकेटविश्वातील रनमशीन विराट ‘हा’ खेळ खेळण्याचा प्रयत्न करताना घाबरतो; स्वत:च केला खुलासा, पाहा VIDEO

सामन्याबद्दल बोलायचे तर, आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील १८ वा सामना भारत आणि आयर्लंड संघात खेळला गेला आहे. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५५ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर आयर्लंड संघाला १५६ धावांचा पाठलाग करताना पावसामुळे आलेल्या व्यत्ययामुळे ८.२ षटकांत २ बाद ५४ धावाच करता आल्या

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 11:30 IST
ताज्या बातम्या