scorecardresearch

गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) माजी अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघ दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी निवड झाली आहे.

गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली

पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) माजी अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघ दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी निवड झाली आहे.गांगुलीने ऑक्टोबरमध्ये ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद सोडले होते. आता तो दिल्ली कॅपिटल्ससह ‘आयएलटी ट्वेन्टी-२०’मधील संघ दुबई कॅपिटल्स आणि दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० लीगमधील पट्रोरिया कॅपिटल्स संघाच्या क्रिकेटविषयक निर्णय आणि कामकाजावर लक्ष ठेवणार आहे.

‘‘सौरव दिल्ली कॅपिटल्सशी पुन्हा जोडला गेला आहे. त्याच्यासोबत चर्चा पूर्ण झाली आहे. त्याने यापूर्वीही दिल्ली कॅपिटल्स संघासोबत काम केले आहे. त्यामुळे संघमालकांशी त्याचे चांगले संबंध आहेत. तो दिल्ली कॅपिटल्ससोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे,’’ असे ‘आयपीएल’मधील सूत्रांकडून सांगण्यात आले.

गांगुलीने यापूर्वी २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रेरक म्हणून काम केले होते. त्याचे मार्गदर्शन युवा खेळाडूंसाठी फायदेशीर ठरले होते. दिल्ली संघाने नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’च्या लिलावात मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि गांगुली यांच्या सूचनेनुसारच खेळाडू खरेदी केल्याची माहिती आहे. गांगुली कॅपिटल्स समूहाच्या ‘आयपीएल’मधील संघासह अन्य लीगमधील संघांवरही लक्ष ठेवणार आहे.

‘‘गौतम गंभीर हा लखनऊ सुपर जायंट्स आणि डरबन सुपर जायंट्स, महेला जयवर्धने हा मुंबई इंडियन्ससह एमआय एमिरेट्स आणि एमआय केप टाऊन या संघांसोबत काम करत आहे. त्यामुळे आता प्रशिक्षक आणि प्रमुख साहाय्यकांची भूमिका आता बदलत आहे. त्यांना ‘आयपीएल’सह परदेशातील लीगमधील आपापल्या संघांवरही लक्ष ठेवावे लागते आहे. आता त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
नवा कर्णधार शोधण्याचे आव्हान

‘आयपीएल’च्या पुढील हंगामाला अजून काही महिने शिल्लक असतानाच दिल्ली कॅपिटल्सचा संघ अडचणीत सापडला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला. त्यामुळे तो संपूर्ण ‘आयपीएल’ला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवा कर्णधार शोधणे हे गांगुली आणि पॉन्टिंगसमोरील आव्हान असणार आहे. तसेच त्यांच्याकडे यष्टिरक्षकाचा फिल सॉल्ट हा एकमेव पर्याय आहे. त्यांनी केएस भरतला लिलावापूर्वी संघमुक्त केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 02:37 IST

संबंधित बातम्या