Sourav Ganguly on Rohit Sharma Captaincy Snub: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने टी-२० आणि कसोटी मधून निवृत्ती जाहीर केली. यासह तो फक्त वनडे सामने खेळताना दिसणार आहे, तर वनडे संघाचं कर्णधारपदही रोहितकडे होतं. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ २०२७ च्या वनडे विश्वचषकात खेळताना दिसेल, असं चाहत्यांना वाटलं होतं. पण आता आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होताच रोहितच्या जागी शुबमन गिलला वनडे संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर रोहितला कर्णधारपदावरून हटवल्याने चाहते आणि माजी खेळाडूही संतापले आहेत, याबाबत आता गांगुलीच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने वर्षभरात सलग दोन ICC विजेतेपदं पटकावली, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचाही समाविष्ट आहे. मात्र आता त्याच्या जागी शुबमन गिलला नवीन वनडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गिलचं पहिलं आव्हान असेल ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका, जी १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहित शर्मा कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याच्या चर्चांवर मोठं वक्तव्य केलं आहे. प्रत्येक मोठ्या कर्णधाराच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात असा टप्पा येतोच, असं गांगुलीने यावर म्हटलं. पुढे गांगुली म्हणाला की, स्वतःलाही आणि राहुल द्रविडलाही आपल्या काळात अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं.

इंडिया टुडेशी बोलताना सौरव गांगुलीने रोहितला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यांनी स्पष्ट केलं की हा निर्णय एकतर्फी नसून तो निवडसमिती आणि ३८ वर्षीय रोहित यांच्यातील परस्पर चर्चेनंतर घेतलेला होता. गांगुलींच्या मते, रोहितचं वय हे बीसीसीआयच्या या मोठ्या निर्णयामागचं प्रमुख कारण होतं.

गांगुली म्हणाला, “मला खात्री आहे की रोहितशी आधी चर्चा झाली असेल. मी याला ‘काढून टाकलं’ असं म्हणणार नाही. हा परस्पर समन्वयाने घेतलेला निर्णय असावा. रोहित एक उत्कृष्ट कर्णधार राहिला आहे, त्याने भारताला टी२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. त्याच्या कामगिरीबाबत प्रश्नचं नाही. पण २०२७ मध्ये रोहितचं वय ४० वर्षे होईल आणि क्रिकेटमध्ये हे वय खूप जास्त आहे. हे माझ्याबरोबरही घडलं, द्रविडबरोबरही घडलं… आणि प्रत्येक खेळाडूला कधीतरी याचा सामना करावा लागतो. शुबमन गिलही जेव्हा चाळीशीत जाईल तेव्हा त्याच्याही बाबतीत असंच घडेल. शेवटी प्रत्येक कारकीर्दीचा शेवट असतोच.”

येत्या १९ ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ६ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसतील.