Ben Stokes On Ben Stokes Hand Shake Controversy: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये पार पडला. दोन्ही संघांमध्ये सामना जिंकण्यासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. इंग्लंडला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. पण शेवटी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर खंबीरपणे उभे राहिले. दोघांनी शतकं झळकावली, त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यातील शेवटच्या एक तासात खूप काही घडलं. भारतीय संघाने सामना वाचवला, इंग्लंडला कळून चुकलं होतं की आता या सामन्याचा निकाल लागू शकणार नाही. त्यामुळे बेन स्टोक्सने हात मिळवून सामना थांबवण्यासाठी सांगितलं. पण रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने हात मिळवण्यास नकार दिला आणि आपली शतकं पूर्ण केली.या सामन्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मँचेस्टर कसोटीतील वादावर डेल स्टेन काय म्हणाला?

डेल स्टेनच्या मते, बेन स्टोक्सने जे केलं ते अगदी योग्य होतं. दोघेही फलंदाज सामना ड्रॉ करण्यासाठी खेळत होते. मग सामन्याचा निकाल लागू शकणार नाही, हे कळाल्यानंतर वैयक्तिक विक्रमांसाठी विक्रमांच्या मागे धावण्याची काय गरज होती. स्टेनने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की,” सामना ड्रॉ होणार आहे, हे जर स्पष्ट झालं होतं. तर जडेजा आणि वॉशिंग्टनला आपल्या वैयक्तिक विक्रमांच्या मागे धावण्याची काय गरज होती. त्याचं लक्ष सामना ड्रॉ करणं होतं, शतक पूर्ण करणं नाही.”

स्टेनच्या मते, जर सामन्याचा निकाल लागणार नव्हता तर त्यांनी स्टोक्सचा प्रस्ताव स्विकारून सामना थांबवायला हवा होता. स्टोक्सने हा प्रस्ताव देऊन अगदी योग्य केलं होतं. जडेजाने शतक झळकावलं त्यावेळीही स्टोक्स हात मिळवण्यासाठी पुढे आला होता. पण भारतीय संघाने वॉशिंग्टन सुंदरचं शतक पूर्ण होण्याची वाट पाहिली. त्यानंतर सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यात इंग्लंडचा विजय निश्चित दिसून येत होता. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३५८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना ६६९ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात दोन मोठे धक्के बसले होते. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर माघारी परतले होते. त्यानंतर शुबमन गिल आणि केएल राहुलने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. राहुलने ९० धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने दमदार शतक झळकावलं. त्यानंतर शेवटी वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजानेही शतक झळकावलं.