क्रीडा की कामक्रीडा?

कामक्रीडेमुळे फुटबॉलपटूंची कामगिरी खालावते का? रशिया, बोस्निया आणि हर्जेगोव्हिना, चिली आणि मेक्सिकोच्या या संघांच्या व्यवस्थापनाचे तरी तसे मत आहे.

कामक्रीडेमुळे फुटबॉलपटूंची कामगिरी खालावते का? रशिया, बोस्निया आणि हर्जेगोव्हिना, चिली आणि मेक्सिकोच्या या संघांच्या व्यवस्थापनाचे तरी तसे मत आहे. त्यामुळेच यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील या संघांना शरीरसंबंधांबाबतच्या कडक आचारसंहितेचे पालन करावे लागत आहे. काही संघांनी त्यावर पूर्णत: बंदी घातली आहे, तर काहींनी असे संबंध केव्हा ठेवावेत, ते करताना कोणती काळजी घ्यावी याचीही नियमावली केली आहे. एकंदर या सगळ्या फतवेबाजीमुळे मैदानातील क्रीडेवर कामक्रीडेने काय परिणाम होतो, हा सुरस विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
‘फिफा’ विश्वचषकात यंदा पदार्पण करणाऱ्या बोस्निया आणि हर्जेगोव्हिनाच्या संघाचे प्रशिक्षक सॅफट सुसिक यांनी या संदर्भात महिनाभर आधीच फतवा काढला होता. ‘‘आमच्या खेळाडूंना ब्राझीलमध्ये संभोग करण्यास मनाई आहे. त्यांना हस्तमैथुन करता येईल किंवा अन्य कोणताही मार्ग शोधता येईल. याबाबत अन्य प्रशिक्षकांचे काय म्हणणे आहे, यात मला रस नाही. ब्राझीलला आम्ही पर्यटनासाठी जात नाही, तर विश्वचषक स्पध्रेत फुटबॉल खेळायला जात आहोत,’’ अशी ठाम भूमिका सुसिक यांनी घेतली. त्यामुळे त्यांच्यावर ‘लष्करी मार्गदर्शक’ असा शिक्का बसला. पण त्याची त्यांना पर्वा नाही. विशेष म्हणजे रशिया, चिली, मेक्सिको यांनीही बोस्नियाचाच कित्ता गिरवला आहे. मेक्सिकोच्या संघाचे प्रशिक्षक गिग्वेल हेरेरा सध्या आपल्या संघाच्या कामगिरीबाबत आणि आपल्या सेक्सबाबतच्या तत्त्वांबाबत विलक्षण समाधानी आहेत. ‘‘एखादा खेळाडू एक महिना किंवा २० दिवस शरीरसंबंधांशिवाय जगू शकत नसेल, तर तो व्यावसायिक खेळाडू म्हणण्याचा मुळीच लायकीचा नाही,’’ असे हेरेरा यांचे तत्त्वज्ञान आहे. ब्राझीलचे प्रशिक्षक लुइस फेलिपे स्कोलारी यांनी खेळाडूंना सेक्सबाबत मार्गदर्शक तत्त्वेही घातली आहेत. स्कोलारी यांची सेक्सला हरकत नाही, पण ‘कसरती टाळा’, असा त्यांचा सल्ला आहे. कोस्टा रिकाच्या संघासाठी तर सेक्स हे इनामाप्रमाणेच असेल. कारण दुसऱ्या फेरीत गेल्याशिवाय त्यांना ही लैंगिक क्रीडा करता येणार नाही.
हे संघ प्रशिक्षक कामक्रीडेवर अशी बंधने घालत असताना, दुसरीकडे काही संघांतील खेळाडू मात्र ‘अर्निबध’ आहेत. अमेरिकेचे प्रशिक्षक जर्गेन क्लिन्समन यांनी खेळाडूंवर सेक्सबाबत कोणतेही र्निबध लादलेले नाहीत. जर्मनी, स्पेन, ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँड्स, स्वित्र्झलड, उरुग्वे आणि इंग्लंड या संघांच्या खेळाडूंना सेक्स करण्याची परवानगी आहे. फ्रेंच खेळाडूंना मात्र सशर्त परवानगी आहे. त्यांना रात्रभर मदनाचा उत्सव साजरा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संघाच्या वैद्यकीय तज्ज्ञांचे याबाबत म्हणणे असे की, ‘‘खेळाडूंसाठी सेक्स आवश्यक आहे, पण त्यांनी रात्रभर त्यातच मश्गूल राहू नये.’’ नायजेरियाच्या खेळाडूंना घालण्यात आलेली अट आणखीच वेगळी आहे. ते सेक्सचा आनंद फक्त आपल्या पत्नीसोबत उपभोगू शकतात, मैत्रिणीसोबत नाही. इंग्लिश संघाचे प्रशिक्षक रॉय हॉजसन स्वित्र्झलडचे प्रशिक्षक असताना त्यांनी सेक्सबाबत बंदी घातली होती. परंतु या वेळी मात्र त्यांनी खेळाडूंना कोणत्याही अटी घातल्या नाहीत.
हे पाहिल्यावर प्रश्न पडतो, की हे योग्य की ते? गेली अनेक वर्षे कामक्रीडेच्या खेळावरील परिणामांबाबतचा अभ्यास सुरू आहे. २००० साली क्लिनिकल जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनने ३१ खेळाडूंचा अभ्यास करून सामन्याच्या आदल्या दिवशी सेक्स केल्याने कामगिरी खालावते का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून सेक्सचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नसून, सेक्स करण्यात खेळाडूंची फारशी ऊर्जा खर्ची जात नाही असा निष्कर्ष निघाला होता. २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकच्या कालखंडात क्रीडानगरीत सुमारे दीड लाख कंडोम खेळाडूंना वितरित करण्यात आल्याचे अहवाल सांगतो. याचा उद्देश खेळाडूंनी सेक्स करताना सुरक्षितता बाळगावी, हाच होता. महत्त्वाच्या कामगिरीला सामोरे जाणाऱ्या क्रीडापटूने सेक्स करावे की करू नये, याबाबतची चर्चा आणि अभ्यास गेली अनेक वष्रे होत आहे. वैद्यकीयतज्ज्ञ तसेच नामांकित प्रशिक्षक आणि खेळाडूसुद्धा सेक्सबाबत सकारात्मक आढळतात. सेक्समुळे आक्रमकता येते आणि चिंता, नैराश्य या गोष्टींवर मात करता येते. या गोष्टींमुळे मानसिक आरोग्य सुदृढ राहते आणि कामगिरीत सुधारणा होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
परंतु काहींचे याबाबत दुमत आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते माजी बॉक्सर मोहम्मद अली यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या लढतीपूर्वी सहा आठवडे सेक्स टाळला होता. अनेक लढतींबाबतही त्यांनी हेच धोरण स्वीकारले होते. सेक्स न केल्यामुळे मन आणि शरीर कणखर बनते, ज्यामुळे कुणाशी दोन हात करणे सोपे जाते, असे अली यांचे म्हणणे होते. ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हा मृत्यू अशा विचारांना क्रीडाक्षेत्रातही अनुयायी आहेत आणि संभोगातून समाधी नव्हे, पण समाधान प्राप्त करणारेही आहेत, एवढाच याचा अर्थ.. दोन्ही गट आपल्या विचारांवर ठाम आहेत आणि या वादाला अंत नाही..
तूर्तास, विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या फेरीचा उत्तरार्ध सुरू आहे. येत्या आठवडाभरात निम्मे संघ परतीचा मार्ग धरतील. यापैकी सेक्स ‘बंदी’वासातील कोणते संघ टिकतील, ते येत्या काही दिवसांतच स्पष्ट  होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sports or sex

ताज्या बातम्या