मुंबई : सर्वकालीन सर्वोत्कृष्ट धावपटूंपैकी एक उसेन बोल्ट पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. मात्र, कुठल्याही स्पर्धेत धावण्यासाठी नाही, तर मुंबईत एक ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रदर्शनीय फुटबॉल लढतीत सहभागी होण्यासाठी तो भारतात येणार आहे. जमैकाचा बोल्ट फुटबॉलचा मोठा चाहता मानला जातो.
जगातील सर्वांत वेगवान धावपटू आणि आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकलेला बोल्ट मुंबईत फुटबॉलपटू, अभिनेते आणि अन्य प्रमुख व्यक्तींसह एका खास सामन्यासाठी मैदानात उतरेल. बंगळूरु एफसी आणि मुंबई सिटी एफसी या संघांमध्ये हा प्रदर्शनीय सामना रंगणार असून, बोल्ट दोन्ही संघाकडून खेळणार आहे. सामन्याच्या पूर्वार्धात एका, तर उत्तरार्धात तो दुसऱ्या संघाकडून खेळेल. या प्रदर्शनीय सामन्यासाठी तिकिटे ठेवण्यात आली आहेत.
धावपटू बोल्ट भारत दौऱ्यावर
विविध समुदाय आणि व्यक्तींना एकत्र आणण्याची आणि प्रेरणा देण्याची ताकद खेळात आहे. भारतीय तरुणांमध्ये फुटबॉलची लोकप्रियता टिकून आहे. याच लोकप्रियतेला गती दगेण्यासाठी आम्ही बोल्टला येथे खेळण्यासाठी आणले आहे, असे पुमा इंडियाचे एम.डी. कार्तिक बालगोपालन यांनी सांगितले. जीवनात ट्रॅकलाच आपलेसे करणाऱ्या बोल्टने ट्रॅकबाहेर फुटबॉल खेळाची आवड देखिल जोपासली आहे. लहानपणी अनेकदा हा खेळ खेळताना त्याने आपला वेग आणि कौशल्याचे प्रात्यक्षिक दाखवले. पण, यामुळे तो अॅथलेटिक्सचा जवळचा झाला. निवृत्तीनंतर मात्र त्याने आपल्या फुटबॉलच्या स्वप्नात रमण्यास पुन्हा सुरुवात केली. प्रशिक्षण घेतले, सराव सामने खेळले आणि गोलही केले आहेत.