AUS vs SA, Steve Smith Injury: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना सुरू आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान ठेवले आहे . या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून टेंबा बावुमा आणि एडन मार्करम यांनी दमदार सुरूवात करून दिली आहे. दरम्यान, क्षेत्ररक्षण करत असताना स्टीव्ह स्मिथला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं आहे.

तर झाले असे की, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना २० वे षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला. पहिल्या डावात चेंडू स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूंच्या हातात जात होते. पण दुसऱ्या डावात चेंडू स्लीपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचत नव्हता. त्यामुळे स्लीपमध्ये असलेले खेळाडू हेल्मेट घालून खूप पुढे उभे होते. त्यामुळे वेगाने येणाऱ्या चेंडूंचा अंदाज घेता येत नव्हता.

मिचेल मार्श गोलंदाजी करत असताना टेंबा बावुमा स्ट्राईकवर होता. जो जवळपास सेट झाला होता. स्टार्कने या षटकातील दुसरा चेंडू अचूक टप्प्यावर टाकला. जो बावुमाच्या बॅटची कडा घेत स्लीपमध्ये असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या दिशेने वेगाने गेला. स्मिथ स्लीपमध्ये हेल्मेट घालून क्षेत्ररक्षण करत होता. फलंदाजाच्या खूप जवळ असल्याने चेंडू खूप वेगाने आला. त्यामुळे त्याला चेंडूच्या गतीचा अंदाज घेता आला नाही. स्मिथकडून हा झेल सुटला. यासह त्याला गंभीर दुखापत देखील झाली. हा चेंडू त्याच्या खांद्याला आणि हाताला जाऊन लागला. ही दुखापत इतकी गंभीर होती की, तो लगेच मैदान सोडून बाहेर गेला.

स्मिथची ही दुखापत गंभीर आहे. त्यामुळे तो मैदानात परतणार की नाही हे अजूनही समजू शकलेलं नाही. स्मिथ ज्याप्रकारे मैदानाबाहेर गेला ते पाहता तो लवकर परत येण्याची शक्यता खूप कमी आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरूवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. टेंबा बावुमाने शानदार अर्धशतकी खेळी केली. तर एडेन मार्करमने शतकी खेळी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.