कोलकाता नाईट रायडर्सने रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा ३ गडी राखून पराभव केला. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी २९ धावांची गरज होती. रिंकू सिंगने शेवटच्या षटकात पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २०५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात केकेआरने शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले. संघाकडून रिंकू सिंगने २१ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या.

रिंकू सिंगच्या या अप्रतिम खेळीची बॉलिवूड अभिनेते शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही फॅन झाली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर रिंकू सिंगचा फोटो शेअर केला आहे. तिने संबंधित स्टोरीमध्ये ‘Unreal’ असं कॅप्शन लिहिलं आहे. रिंकूने अखेरच्या षटकांत पाच मॅजिकल सिक्सर्स लगावल्यानंतर सुहाना खानने ही पोस्ट शेअर केली आहे.

खरं तर, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात २०५ धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि २० धावांवर रहमानउल्ला गुरबाजच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. यानंतर, २८ धावांवर नारायण जगदीशनच्या रुपाने संघाला आणखी एक धक्का बसला. नारायण जगदीशला केवळ ६ धावा करता आल्या.

यानंतर व्यंकटेश अय्यरने कर्णधार नितीश राणासह संघाची धावसंख्या पहिल्या ६ षटकांत २ गडी गमावून ४३ पर्यंत नेली. यानंतर दोन्ही फलंदाजांनी या सामन्यात कोलकाता संघाला विजयाच्या समीप नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूत १०० धावांची शानदार भागीदारी केली. २९ चेंडूत ४५ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या कर्णधार नितीश राणाच्या रूपाने कोलकाताच्या संघाला १२८ धावांवर तिसरा धक्का बसला.

व्यंकटेश अय्यरने रिंकू सिंगच्या साथीने धावांचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही ४० चेंडूत ८३ धावांची खेळी करून बाद झाला. यानंतर गुजरात संघासाठी या सामन्यात कर्णधारपद भूषवणाऱ्या राशिद खानची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली, त्याने १७व्या षटकातील पहिल्या ३ चेंडूत सलग ३ बळी घेत सामना गुजरातकडे वळवण्याचे काम केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिंकू सिंगने ७ चेंडूत ४० धावा करत कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला –
या सामन्यात गुजरातचा संघ सहज सामना जिंकेल असे सर्वांना वाटत होतं. पण रिंकू सिंगने १९व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार खेचून कोलकात्याच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेश यादवने १ धाव घेत रिंकूला स्ट्राइक दिली. त्यानंतर रिंकूने सलग पाच मॅजिकल षटकार ठोकून कोलकताला अप्रतिम विजय मिळवून दिला.