Suryakumar Yadav At Express Adda: भारतीय टी -२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने द इंडियन एक्सप्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या खास कार्यक्रमाला हजेरी लावली. यादरम्यान त्याने द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका आणि द इंडियन ग्रुपचे उप सहयोगी संपादक देवेंद्र पांडे यांच्यासोबत चर्चा केली. यादरम्यान त्याने आशिया चषक स्पर्धेत गाजलेल्या नो हँडशेकबाबत मोठा खुलासा केला आहे.

पाकिस्तानसोबत हात न मिळवण्याचा प्लॅन कोणाचा होता?

आशिया चषक २०२५ स्पर्धेदरम्यान भारत – पाकिस्तान यांच्यातील सामन्याहून अधिक चर्चा नो हँडशेकची रंगली. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं होतं. दरम्यान हा प्लॅन नेमका कोणाचा होता? याबाबत सूर्यकुमार यादवने आता खुलासा केला आहे.

सूर्यकुमार यादव म्हणाला, “मी त्यादिवशी तो एक निर्णय घेतला. योगायोगाने त्याच दिवशी माझा वाढदिवसही होता. त्यामुळे मला वाटलं हा योग्य दिवस आहे. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला. पण मला माहीत नव्हतं की मी प्रत्यक्षात ही भूमिका घेईल. पण देशासाठी पुढाकार घेण्यात काहीच गैर नाही.”

तसेच तो पुढे म्हणाला, “सुरुवातीला काही लोकांनी, खेळायचंय का? असा प्रश्न विचारला होता. पण नंतर आम्ही घेतलेल्या भूमिकेचे सकारात्मक परिणाम दिसून आले. पण नंतर मला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या.” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

भारतीय संघाने पटकावला जेतेपदाचा मान

या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. भारताने पाकिस्तानला ३ वेळा पराभूत केलं. अंतिम सामन्यातही भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात तिलक वर्माच्या दमदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने जेतेपदाचा मान मिळवला. पण सामना जिंकूनही भारतीय संघाला ट्रॉफी दिली गेली नव्हती. भारतीय खेळाडूंनी एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले होते. ही ट्रॉफी भारतीय संघाला अजूनही दिली गेलेली नाही.