Suryakumar Yadav On His Plan B: भारतीय टी -२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात खूप उशिराने झाली. ज्यावेळी इतर खेळाडू निवृत्तीची घोषणा करतात त्यावेळी त्याला पदार्पणाची संधी मिळाली. पण त्याने या संधीचं सोनं केलं. कमी वेळात त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठलं. यासह रोहित शर्माने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सूर्याकडे टी -२० संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान जर क्रिकेटपटू नसता तर सूर्यकुमार यादव काय बनला असता? याबाबत त्याने आता खुलासा केला आहे.

शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) द इंडियन एक्सप्रेसकडून आयोजित ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमाला सूर्यकुमार यादवने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका आणि द इंडियन ग्रुपचे उप सहयोगी संपादक देवेंद्र पांडे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना सूर्यकुमार यादवने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक मजेशीर किस्से सांगितले.

दरम्यान, जर क्रिकेटमध्ये करिअर नसते तर त्याने काय केलं असतं? याबाबत सूर्यकुमार यादवने मोठा खुलासा केला आहे. एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “मी याबद्दल कधीच विचार केला नाही. पण मला आधीपासून वाटायचं की, मी चांगला व्यावसायिक होऊ शकलो असतो. माझ्या आई -वडिलांनाही वाटायचं की, माझ्याकडे व्यवसायासाठी चांगलं डोकं आहे. मी इतरांनाही व्यवसाय करण्यासाठी चांगले सल्ले दिले आहेत. त्यामुळे जर मी क्रिकेट खेळत नसतो तर नक्कीच व्यवसाय सुरू केला असता.”

रोहित शर्माने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सूर्यकुमार यादवकडे टी -२० संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत विजय मिळवला. कर्णधार म्हणून ही त्याची पहिलीच मोठी स्पर्धा होती. येत्या काही महिन्यात टी -२० वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसू शकतो. त्यामुळे भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप जिंकून देण्याची जबाबदारी आता सूर्यकुमार यादवकडे असणार आहे.

या स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ५ टी -२० सामने खेळणार आहे. हा दौरा आगामी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.