नवी दिल्ली : जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीतील अव्वल फलंदाज सूर्यकुमार यादवला आणखी काही ‘आयपीएल’ सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी गरजेचा आहे, असे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

यंदाच्या ‘आयपीएल’मधील आपल्या पहिल्या दोनही सामन्यांत मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला आणि या दोनही सामन्यांत सूर्यकुमार खेळू शकला नाही. ‘‘सूर्यकुमारच्या तंदुरुस्तीत सुधारणा होत आहे आणि तो लवकरच मुंबई इंडियन्स संघात दाखलही होईल. मात्र, त्याला आणखी काही सामन्यांना मुकावे लागणार आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्राने सांगितले.

‘‘सूर्यकुमारचे महत्त्व ‘बीसीसीआय’ला ठाऊक आहे. तो ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा यासाठी ‘बीसीसीआय’ प्रयत्नशील आहे. त्यापूर्वी तो मुंबई इंडियन्ससाठी खेळेल. मात्र, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला मैदानावरील पुनरागमनासाठी घाई करू देणार नाही,’’ असेही सूत्राकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>IPL 2024 : राजस्थान रॉयल्सची मोठी घोषणा! प्रसिध कृष्णाच्या जागी लखनऊ फ्रँचायझीच्या ‘या’खेळाडूला केले करारबद्ध

सूर्यकुमारची विश्वातील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० फलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्यामुळे जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात सूर्यकुमारची भूमिका भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरू शकेल. त्याने भारतासाठी ६० ट्वेन्टी-२० सामन्यांत २१४१ धावा केल्या असून यात चार शतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान सूर्यकुमारच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्यावर जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

सूर्यकुमारने मुंबईसाठी गेल्या ‘आयपीएल’ हंगामात १६ सामन्यांत १८१.१४च्या स्ट्राईक रेटने ६०५ धावा केल्या होत्या.