scorecardresearch

T20 WC SL Vs Ban: श्रीलंकेचा बांगलादेशवर ५ गडी राखून विजय

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत श्रीलंकेनं बांगलादेशला ५ गडी राखून पराभूत केलं.

T20 WC SL Vs Ban: श्रीलंकेचा बांगलादेशवर ५ गडी राखून विजय
T20 WC: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना (Photo- T20 World Cup Twitter)

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत श्रीलंकेनं बांगलादेशला ५ गडी राखून पराभूत केलं. बांगलादेशने श्रीलंकेला ४ गडी गमवून १७२ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेनं १८ षटकं ५ चेंडूत ५ गडी गमवून पूर्ण केलं.

श्रीलंकेचा डाव

श्रीलंकेला कुसल परेराच्या रुपाने पहिला धक्का बसला. १ धाव करून परेरा तंबूत परतला. त्यानंतर पथुम निस्सांका आणि चरिथ असालंका यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात शाकिब अल हसनला यश आलं. त्याच्या गोलंदाजीवर पथूम निस्सांका त्रिफळाचीत झाला. त्यानंतर लगेचच अविष्का फर्नांडो बाद होत तंबूत परतला. तो बाद होऊन तंबूत परतत नाहीत तो वनिंदू हसरंगा ६ धावा करून बाद झाला. पाचव्या गड्यासाठी चरिथ असलंका आणि भानुका राजपक्षेनं विजयी भागीदारी केली. संघाला विजयासाठी ९ धावांची आवश्यकता असताना भानुका नसुम अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने ३१ चेंडूत ५३ धावा केल्या. तर चरिथ असलंकाने ४९ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या.

बांगलादेशचा डाव

बांगलादेशला लिटन दासच्या रुपाने पहिला धक्का बसला. लहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर फटका मारल्यानंतर दासुन शनाकाने त्याचा झेल घेतला. १६ चेंडूत १६ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला शाकिब अल हसनही मैदानावर जास्त काळ तग धरू शकला नाही. ७ चेंडूत १० धावा करून बाद झाला. चमिकाच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. मोहम्मद नईमच्या अर्धशतकी खेळीमुळे बांगलादेशला धावसंख्या उभारण्यास मदत झाली. मोहम्मदने ५२ चेंडूत ६२ धावा केल्या. या खेळीत ६ चौकारांचा समावेश आहे. बिनुरा फर्नांडोने त्याच्या गोलंदाजीवरच मोहम्मदचा झेल घेतला. नईमनंतर मुशफिकुर रहिमने अर्धशतकी खेळी केली. रहिमने ३७ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या.

दोन्ही देशांनी २०१८ नंतर कोणताही आंतरराष्ट्रीय टी २० सामना खेळलेला नाही. २०१८ मध्ये खेळले तीन टी २० सामन्यात बांगलादेशने दोन सामने जिंकले होते. दोन्ही संघांत ११ ट्वेन्टी-२० सामने झाले असून श्रीलंकेने त्यापैकी सात, तर बांगलादेशने चार लढती जिंकल्या आहेत. श्रीलंका-बांगलादेश टी-२० विश्वचषकात दुसऱ्यादा आमनेसामने येत असून २००७ मध्ये झालेल्या एकमेव लढतीत श्रीलंकेने विजय मिळवला होता.

श्रीलंका : दसुन शनका (कर्णधार), कुशल परेरा, दिनेश चंडिमल, पथुमश्रीलंका : दसुन शनका (कर्णधार), कुशल परेरा, पथुम निस्सांका, चरिथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा, दुश्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो

बांगलादेश : मोहम्मद नईम, लिटन दास, शाकिब अल हसन, मुशफिकूर रहिम, मोहम्मद महमदुल्ला (कर्णधार), अफिफ होसेन, नुरुल हसन, मेहेदी हसन, नसुम अहमद,मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजूर रहमान

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 15:06 IST

संबंधित बातम्या