भारताने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर आज (४ जुलै) भारतीय संघ भारतात दाखल झाला. सकाळी दिल्ली विमानतळावर भारतीय संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यानंतर भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर भारतीय संघ आता मुंबईत दाखल झाला असून जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत जोरगार स्वागत करण्यात येत आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. क्रिकेटच्या चाहत्यांकडून भारतीय संघाच्या अभिनंदनाच्या घोषणा देण्यात येत आहेत.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या गर्दीमधून एक वेगळं दृष्य पाहायला मिळालं आहे. मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दीतून एका ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन दिला आहे. या प्रसंगाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हवर एवढ्या मोठ्या गर्दीमधूनही ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी काही सेंकदात रस्ता मोकळा करून दिल्यामुळे अनेकांकडून कौतुकही करण्यात येत आहे.

हेही वाचा : टीम इंडियासह फोटोशूट करताना पंतप्रधान मोदींच्या ‘या’ कृतीने वेधले सर्वांचे लक्ष, फोटो व्हायरल झाल्याने होतयं कौतुक

दरम्यान, २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला होता. तब्बल १७ वर्षांनंतर भारताने टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीत भारतीय संघाबरोबर जवळपास एक ते दीड तास संवाद साधला.

जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील गर्दी पाहून भारत आणि महाराष्ट्रातील जनतेचं क्रिकेटवर किती प्रेम आहे? याचा प्रत्यय आज मुंबईतील गर्दी पाहिल्यानंतर येत आहे. दरम्यान, मुंबईत आज फक्त गर्दीच गर्दी दिसत असून अतिशय उत्साहाचं वातावरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाला वॉटर सॅल्यूट मिळाला

टीम इंडियाच्या विस्तारा फ्लाइट ‘UK1845’ ला मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर वॉटर सॅल्यूट देण्यात आला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या विमानाच्या दोन्ही बाजूला उभ्या राहिल्या आणि पाण्याचा फवारा मारला. विमानतळाबाहेरही चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सर्वजण आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची आतुरतेने वाट पाहत आहेत.