आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आजच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानविरुद्ध दोन हात करत आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियासाठी महत्वाच्या असणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी साधारण दर्जाची फलंदाजी करत १६८ धावा केल्या. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी सार्थकी ठरवला. अफगाणिस्तानला विजयासाठी १६८ धावांचे आव्हान असणार आहे आणि हे आव्हान ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी पाहता फार सोपे असणार नाही पण खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे.

कांगारूंच्या संघाकडून ग्लेन मॅक्सवेलने नाबाद ५४ धावांची शानदार खेळी केली. मिचेल मार्शने ३० चेंडूत ४५ धावा करत त्याला मोलाची साथ दिली. फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये ५४ धावा करत ३ गडी गमावले. कर्णधार अ‍ॅरॉन फिंचच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी असलेला डेव्हिड वॉर्नर केवळ २५ धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला मार्कस स्टॉयनिसही फारशी मोठी खेळी करू शकला नाही. त्याने २१ चेंडूत २५ धावा केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफगाण संघाकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक ३ बळी घेत त्याने ४ षटकात २१ धावा दिल्या. फजल हक फारुकीने ४ षटकात २९ धावा देत २ गडी बाद करत त्याला साथ दिली. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला अफगाणिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागणार आहे. तसेच चांगल्या नेट रनरेटसाठी अफगाणिस्तान संघाला १०६ धावांच्या आत रोखणे आवश्यक आहे.