T20 World Cup 2024: अमेरिकेच्या संघाने टी-२० विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात संघाने दोन मोठे विजय मिळवले असून भारताविरूद्धच्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. पण भारतालाही अमेरिकेने सहजासहजी विजय मिळवू दिला नाही. तर पाकिस्तानसारख्या टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावलेल्या संघाचा अमेरिकेने पराभव करत मोठा अपसेट घडवला. यादरम्यान व्हाईट हाऊसचे अधिकारी मॅथ्यू मिलर यांना यूएसए क्रिकेट संघाने T20 विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केल्याबद्दल टिप्पणी करण्यास सांगितले. याच्या उत्तरात मिलर यांनी केलेले वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नावर गमतीशीर उत्तर दिले. जेव्हा त्यांना यूएसए क्रिकेट संघाने सध्या सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकात अमेरिकेन पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिल्याबद्दल याबद्दल विचारले गेले. प्रेस ब्रीफिंग दरम्यान, मिलर यांना एका पत्रकाराने विचारले की अमेरिका या एका सहयोगी संघाने पूर्णवेळ क्रिकेट खेळणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला, यावर आपले मत मांडण्यास सांगितले. यावर बोलताना अधिका-याने सांगितले की, “जेव्हा मी माझ्या कार्य कक्षेबाहेरच्या गोष्टींवर भाष्य करतो तेव्हा मी अडचणीत सापडतो आणि मी म्हणेन की पाकिस्तान क्रिकेट संघ त्या श्रेणीमध्ये येतो.”
गेल्या आठवड्यात टी-२० विश्वचषकातील गट सामन्यात एकेकाळच्या विश्वविजेत्या पाकिस्तानला अमेरिकेसारख्या नवख्या संघाने सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा धक्का दिला. दोन्ही संघांनी प्रत्येकी १५९ धावा केल्यावर, ‘सुपर ओव्हर’मध्ये विजय निश्चित झाला. सुपर ओव्हरमध्ये सुरूवातीला फलंदाजी करताना अमेरिकेने १८ धावा केल्या. या सुपर ओव्हरमधील पाकिस्तान संघाची फिल्डिंग ही खूपच सुमार दर्जाची होती आणि एका चौकारानंतर वाईड आणि एकेरी दुहेरी धावांच्या आधारे अमेरिका संघाने १८ धावा केल्या.
यानंतर सुपर ओव्हरमध्ये १८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान अवघ्या १३ धावा करत पराभूत झाला. अमेरिकेकडून भारतीय वंशाच्या मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकर शानदार गोलंदाजी केली. या पराभवामुळे पाकिस्तानचे चाहते, तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू निराश झाले होते. यानंतर पाकिस्तानला भारताकडून ही पराभव पत्करावा लागल्याने एकूणच संघाच्या कामगिरीवर सर्वच जण भडकले. जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर लो स्कोअरिंग सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला.