झिम्बाब्वेने टी२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी पाकिस्तानवर एका धावेने अविश्वसनीय विजय नोंदवला आणि या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या आशा निर्माण केल्या आहेत. पात्रता फेरीतून सुपर-१२ मध्ये पहिल्यांदाच पात्र होत त्यांनी खूप मोठा अपसेट केला आहे. याआधी गेल्या रविवारी झालेल्या टी२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून चार गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता; झिम्बाब्वेच्या पराभवामुळे, पाकिस्तानला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतीलच, परंतु त्यांच्या गटातील इतर सामन्यांमध्ये काही निकाल त्यांच्या बाजूने लागतील अशी आशा आहे.
अष्टपैलू कामगिरी करणारा सिकंदर रझा हा झिम्बाब्वेसाठी खूप मोठा नायक ठरला, कारण त्याने धावांचा पाठलाग करताना शान मसूदसह तीन महत्त्वपूर्ण बळी घेतले, तर ब्रॅड इव्हान्स, ज्याने सामन्याचे शेवटचे षटक टाकले, त्याने देखील दबावाखाली चमकदार कामगिरी केली. चार षटकात दोन गडी बाद करत त्याने २५ धावा दिल्या.
सिकंदर रझाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले आणि सामनानंतरच्या पत्रकार परिषदेलाही तो उपस्थित राहिला. रझाला विचारण्यात आलेला पहिला प्रश्न झिम्बाब्वेच्या त्यांच्या खेळ जिंकण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याबाबत होता. “कोणत्या वेळी, हा सामना तुमच्या बाजूने येऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसू लागला?” असे रिपोर्टरने सिकंदरला विचारले. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला झिम्बाब्वे अष्टपैलू खेळाडूने जबरदस्त उत्तर दिलं आहे.
झिम्बाब्वेच्या या अष्टपैलू खेळाडूने यावर भन्नाट प्रतिक्रिया देताना म्हटले की, “पहिला चेंडू टाकण्यापूर्वी. मला स्वतःला वाटले की आम्ही १५-२० धावा कमी आहोत, परंतु मला खरोखरच संघातील या खेळाडूंवर आधीपासूनच खूप विश्वास होता. आम्हाला माहित होते की आम्ही चांगले क्षेत्ररक्षण केले आणि योग्य ठिकाणी जर चेंडू टाकला तर आम्ही पाकिस्तानला हरवू शकतो. या संधींचा आम्ही पुरेपूर फायदा घेत सलामीविरांनी झिम्बाब्वेला चांगली सुरुवात करून दिली. नगारावा आणि म्बुनू (मुझाराबानी) यांनी पहिल्या दोन षटकांतचं मोठे फटके मारत संघाला उत्तम सुरुवात करून दिली पण नंतर मात्र अर्थातच शेवटच्या षटकात आमच्या लवकर विकेट पडल्या,” रझा यावेळी सांगत होता.
झिम्बाब्वे टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकेल का असे विचारले असता, रझाने सांगितले की, “आम्ही संघातील मिटींगमध्ये एका वेळी एक सामना असा विचार करत पुढे जात आहोत आम्ही अजून तरी तसा विचार केला नाही पण ज्याप्रमाणे आम्ही खेळत आहोत तर कदाचित नशीब साथ देईल असे वाटते. आमची सर्व लक्ष हे पाकिस्तानवर केंद्रित केले होते, आता आम्ही बांगलादेशविरुद्ध खेळताना आमच्या कुठे चुका होऊ शकतात याचे आम्ही विश्लेषण करू, पण इंशाअल्लाह, आम्ही संघातील या खेळाडूंवर विश्वास ठेवतो. आता हा सर्वांसाठी ग्रुप उघडला आहे. जो कोणी त्यादिवशी चांगले क्रिकेट खेळेल तो जिंकू शकतो.”