Suryakumar Yadav Record Against Pakistan: आशिया चषक २०२५ स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. आशियातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकूण ८ संघ खेळताना दिसून येणार आहेत. ज्यात भारत, पाकिस्तानसह, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, यूएई, हाँगकाँग आणि ओमान या संघांचा समावेश असणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेची सुरूवात यूएईविरूद्ध होणाऱ्या सामन्याने करणार आहे. पण, १४ सप्टेंबरला होणारी लढत या स्पर्धेतील प्रमुख लढत असणार आहे.

यावेळी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तो पहिल्यांदाच कुठल्याही मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्व क्षमतेची कसोटी लागणार आहे. यासह त्याला फलंदाजीत देखील दमदार कामगिरी करावी लागणार आहे. दरम्यान पाकिस्तानविरूद्ध टी-२० क्रिकेट खेळताना सूर्यकुमार यादवने कशी कामगिरी केली आहे? जाणून घ्या.

पाकिस्तानविरूद्ध कशी आहे सूर्यकुमार यादवची कामगिरी?

भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये भारतीय टी-२० संघात पदार्पण केलं होत.त्याला पाकिस्तानविरूद्ध ५ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १२.८० च्या सरासरीने ६४ धावा केल्या आहेत. यादरम्यान १८ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-२० क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज म्हणून ओळख मिळवलेल्या सूर्यकुमार यादवला टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरूद्ध आपली छाप सोडता आलेली नाही. या ५ सामन्यांमध्ये त्याला केवळ १ षटकार मारता आला आहे. तर त्याने ७ चौकार मारले आहेत. यावरून हे स्पष्ट होतंय की, पाकिस्तानविरूद्ध खेळताना सूर्यकुमार यादवला स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

आशिया चषकात पाकिस्तानविरूद्ध खेळताना केलेली कामगिरी

सूर्यकुमार यादवला पाकिस्तानविरूद्ध ५ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या ५ पैकी २ सामने हे त्याने आशिया चषकात खेळले आहेत. २०२२ मध्ये झालेल्या आशिया चषकात त्याला २ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना अवघ्या ३१ धावा करता आल्या होत्या. यादरम्यान १८ धावा ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती. त्यामुळे आगामी हंगामात सूर्यकुमार यादवला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.

आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह

राखीव खेळाडू
प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, रियान पराग