Team India Playing 11 For IND vs ENG 2nd Test: भारतीय संघाने अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. भारतीय संघाने एजबस्टनच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकला नव्हता. भारताला ८ पैकी ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तर एक सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे या मैदानावर इंग्लंडला हरवणं मुळीच सोपं काम नव्हतं. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, या मालिकेसाठी शुबमन गिलकडे भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे युवा कर्णधार काय करणार? असं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र, गिलने जसप्रीत बुमराह संघात नसताना इंग्लंडला एजबस्टनमध्ये पराभूत केलं आहे. यासह भारताने या मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे. मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होऊ शकतो.

एजबस्टन कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेज करण्यासाठी विश्रांती दिली गेली होती. त्यामुळे त्याच्या जागी आकाशदीपचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला. आकाशदीपने ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. त्याला साथ मिळाली, मोहम्मद सिराजची.

आकाशदीपने दोन्ही डावात मिळून १० गडी बाद केले. तर मोहम्मद सिराजने दोन्ही डावात मिळून ७ गडी बाद केले. मात्र, या दोघांनाही तिसरा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाकडून हवी तशी साथ मिळाली नाही. प्रसिध कृष्णाला दोन्ही डावात मिळून केवळ एक गडी बाद करण्यात आला. ही त्याची दुसऱ्या कसोटी सामन्यातील कामगिरी. तर पहिल्या कसोटी सामन्यातही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याला ५ गडी बाद करता आले होते.

दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर कर्णधार शुबमन गिलने प्रसिध कृष्णाचं कौतुक केलं. तो म्हणाला, “प्रसिध कृष्णाने चांगली गोलंदाजी केली. त्याला विकेट्स नाही मिळाल्या, पण त्याने अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली.” गिलने त्याचं कौतुक केलं असलं, तरीदेखील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल केला जाणार आहे. कारण या सामन्यात जसप्रीत बुमराह कमबॅक करणार आहे. बुमराहच्या कमबॅकनंतर गिल कोणाला बाहेर बसवणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गिल कोणाला बसवणार?

गोलंदाजांची कामगिरी पाहिली, तर सिराज आणि आकाशदीप यांनी दमदार कामगिरी केली आहे. तर प्रसिध कृष्णाला आपली छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे बुमराहच्या कमबॅकनंतर प्रसिद्ध कृष्णाला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. असं झाल्यास जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करताना दिसेल. तर सिराज आणि आकाशदीप त्याला साथ देऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.