Team India Squad For Australia Tour: भारतीय संघ येत्या काही दिवसात आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर भारतीय संघ एकही वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही. १९ ऑक्टोबरपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबरला तर दुसरा सामना २३ ऑक्टोबरला आणि तिसरा सामना २५ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसून येणार आहेत. विराट आणि रोहित दोघेही वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे विराट आणि रोहित ही मालिका खेळणार की नाही? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

वनडे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे. युवा फलंदाज शुबमन गिल हा वनडे संघाचा उपकर्णधार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, शुबमन गिलला या मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. शुबमन गिलची आशिया चषकासाठी भारतीय टी-२० संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.

गिलला विश्रांती दिल्यामुळे यशस्वी जैस्वालचं वनडे संघात पुनरागमन करण्याचं दार उघडणार आहे. जैस्वाल आणि रोहित ही जोडी ऑस्ट्रेलियात डावाची सुरूवात करताना दिसून येऊ शकते. तर ऋषभ पंतच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसू शकतात. या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संधी दिली जाऊ शकते. तर फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती यांना संधी दिली जाऊ शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.