Virat Kohli Sets New Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने १८६ धावांची धडाकेबाज खेळी केली. जवळपास तीन वर्षानंतर कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा सूर गवसला. कोहलीच्या चमकदार कामगिरीमुळं त्याच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. कोहलीने केलेल्या अप्रतिम फलंदाजीमुळं त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं. हा अवॉर्ड मिळण्यासोबतच कोहलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हा विक्रम याआधी जगातील कोणत्याच खेळाडूने केला नाहीय.

विराट कोहली क्रिकेटच्या तिनही फॉर्मेटमध्ये १० किंवा १० पेक्षाही जास्त वेळ ‘प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्डट जिंकणारा जगातील पहिला क्रिकेटर ठरला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये विराटचा हा १९ वा ‘मॅन ऑफ द मॅच’ अवॉर्ड आहे. तर वनडेत त्याने ३८ आणि टी २० मध्ये १५ वेळा हा अवॉर्ड जिंकला आहे. त्यामुळे विराटच्या नावावर एकूण ६३ ‘प्लेयर ऑफ द मॅच’ची नोंद झाली आहे. सचिन तेंडुलकरनंतर ही अप्रतिम कामगिरी फक्त विराट कोहलीने केली आहे. सचिनच्या नावावर ६६४ मॅचमध्ये ७६ ‘प्लेयर ऑफ द मॅच’ अवॉर्डची नोंद आहे.

नक्की वाचा – WTC 2023: पत्रकार परिषदेत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला, “WTC फायनलच्या तयारीसाठी आयपीएलमध्ये…”

अहमदाबादमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या अखेरच्या चौथ्या सामन्यात विराटने शतकी खेळी करून तीन वर्षांपासूनचा शतकांचा दुष्काळ संपवला. कोहलीने १८६ धावांची खेळी केल्यानं भारताला ५७१ धावांपर्यंत मजल मारता आली. २०१९ नंतर कोहलीने टेस्ट क्रिकेटमधील २८ वे शतक झळकावले. ३८४ चेंडूत कोहलीने १८५ धावांची खेळी साकारली. मागील तीन कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी खेळपट्टी अनुकूल नव्हती. पण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फलंदाजांसाठी खेळपट्टी अनुकूल मिळाल्याने विराटने या संधीचा फायदा घेतला आणि भारतासाठी धावांचा डोंगर रचला.