सरत्या वर्षांत भारतीय यशाचा शिल्पकार कोण, या प्रश्नाला विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन अशी दोन उत्तरे सहज कुणीही देऊ शकेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्यांच्या सप्टेंबपर्यंतच्या वर्षगणतीनुसार अश्विनच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. परंतु तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील आकडेवारींचा वेध घेतल्यास विराट कोहलीचे नाव सहज अव्वल ठरते. आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर विराजमान आहे, ही आणखी एक सुखद गोष्ट वर्षांखेरीस दिलासा देणारी आहे. पण ताज्या मालिकेत इंग्लिश गोलंदाज जेम्स अॅण्डरसनने विराटच्या फलंदाजीचे वास्तववादी विश्लेषण करून नव्या वादाला जरी तोंड फोडले असले तरी हे सत्य नाकारण्यासारखे मुळीच नाही. विराटच नव्हे, अश्विन आणि भारताच्या यशालाही हे मोजमाप लावता येऊ शकते.
अनुकूल खेळपट्टय़ांवर फिरकीच्या बळावर विजयाचे इमले रचण्याचे समीकरण भारतासाठी नवे नाही. परंतु इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसारख्या वातावरणात जर भारताने यश मिळवले, तर अॅण्डरसन किंवा अन्य कुणालाही असे वाभाडे काढता येणार नाही. भारताने तूर्तास १८ कसोटी सामन्यांत अपराजित राहण्याची किमया साधली आहे. यातील बहुतांशी यश हे भारतातील आहे आणि परदेशातील मर्दुमकी ही वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यासारख्या कसोटी क्रिकेटमध्ये फारसे सामथ्र्य न उरलेल्या दुबळ्या संघांविरुद्धचे आहे. विराट युगाचा हा खऱ्या अर्थाने प्रारंभ असला तरी कसोटी क्रिकेटमधील दिग्गज देशांमध्येही विजयाचा आलेख उंचावत राहो, अशी आशा करून तूर्तास, इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या ४-० अशा ऐतिहासिक कसोटी विजयाचा आढावा घेऊ या –
विराटवर्ष आणि उमदे नेतृत्व
२०१६ हे वर्ष विराटची फलंदाजी आणि नेतृत्वगुणाची छाप पाडणारे होते. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील त्याच्या डोळे दिपवणाऱ्या कामगिरीमुळे या वर्षांला ‘विराटवर्ष’ असे कुणी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ८६.५०च्या सरासरीने एकूण २५९५ धावा काढल्या आहेत. मालिका जिंकल्यानंतर ‘ही तर फक्त सुरुवात आहे..’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करून विराटने सर्वच संघांना आगामी भारतीय घोडदौडीचा इशाराच जणू दिला आहे. याचप्रमाणे अॅण्डरसनचे आव्हानसुद्धा त्याने स्वीकारले आहे. २०१४च्या मालिकेतील अपयश इंग्लंडमधील आगामी मालिकेत पुसून टाकण्याचा संकल्पच जणू त्याने केला. त्यामुळेच या मालिकेआधी काऊंटी क्रिकेटमध्ये पुरेसा सराव करीन, हे त्याने ठामपणे सांगितले. विराटच्या नेतृत्वाचे उमदेपण कसोटी क्रिकेटमध्ये सहजगत्या अधोरेखित होते. त्यामुळेच या मालिकेनंतर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही विराटकडेच नेतृत्वाची धुरा सोपवण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अश्विन-जडेजाचे अष्टपैलुत्व
इंग्लंडविरुद्धच्या यशात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या अष्टपैलू कामगिरीचा सिंहाचा वाटा आहे. अश्विनने या मालिकेत ३०६ धावा केल्या आणि २८ बळी मिळवले, तर जडेजाने २२४ धावा काढून २६ बळी मिळवले. या दोघांनी मिळून ५४ इंग्लिश फलंदाजांना बाद केले, ही कामगिरी भारतातील अनुकूल वातावरणातील असली, तरी कौतुकास्पद नक्कीच आहे. केवळ गोलंदाजीपुरतेच ते मर्यादित न राहता. जबाबदारीने फलंदाजीसुद्धा या दोघांनी केली. त्यामुळे आघाडीचा एखाद-दुसरा फलंदाज खेळून जायचा, पण भारताचे शेपूट गुंडाळणे, हे अधिक कठीण असल्याचे इंग्लंडला प्रत्ययास आले. विराट वगळता आघाडीच्या फळीत सातत्यपूर्ण धावा कुणाकडूनही झाल्या नाहीत. सलामीची भागीदारी अखेरच्या कसोटीत लोकेश राहुल आणि पार्थिव पटेलकडून पाहायला मिळाली. या सर्व परिस्थितीत अश्विन आणि जडेजाने फलंदाजीचा भारही समर्थपणे पेलून भारताच्या मोठय़ा धावसंख्येत भर घातली. अगदी भारताचा तिसरा फिरकीपटू जयंत यादवच्या खात्यावरही एक शतक आणि एका अर्धशतकासह एकंदर २२१ धावा जमा आहेत. याशिवाय ९ बळीसुद्धा त्याने मिळवले आहेत.
भारतीय ‘अ’ संघाकडून रसद
इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघात अश्विन, जडेजा, चेतेश्वर पुजारा, विजय आणि विराट हे अनुभवी खेळाडू होते. परंतु आपल्या कारकीर्दीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्रिशतक साकारणारा करुण नायर, सलामीवीर लोकेश राहुल आणि अष्टपैलू जयंत यादव हे या मालिकेत प्रकाशझोतात आलेले खेळाडू. शिखर धवन आणि रोहित शर्माने मालिकेच्या आधीच दुखापतीमुळे माघार घेतली. पण अजिंक्य रहाणे, राहुल, विजय, वृद्धिमान साहा याचप्रमाणे अनेक खेळाडूंना या मालिकेत दुखापतीमुळे काही सामन्यांत माघार घ्यावी लागली. पण याच संधीचे सोने करून काही खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. यात नायर, राहुल आणि यादव या खेळाडूंचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. हे तिन्ही खेळाडू भारतीय ‘अ’ संघात राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली घडले आहेत. त्यामुळे भारताची दुसरी फळी समर्थपणे मार्गक्रमण करताना पहिल्या फळीलासुद्धा गुणवान खेळाडूंची रसद पुरवत असल्याचे अधोरेखित झाले.
prashant.keni@expressindia.com
