टेनिसच्या खेळामध्ये काही खेळाडूंच्या नावाला नेहमीच सर्वांचं प्राधान्य असतं. मग त्या खेळाडूच्या वाट्याला यश येवो किंवा अपयश. क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असाच एक खेळाडू म्हणजे रॉजर फेडरर. टेनिस या खेळामध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करत त्याने आजवर अनेकदा या खेळावर असणारं प्रभुत्वं सिद्ध केलं. सध्याच्या घडीला युएस ओपनमधून त्याला माघार घ्यावी लागली असली तरीही याच स्पर्धेतील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे.

निक कार्गिओस या खेळाडूविरोधात कोर्टवर खेळतेवेळी फेडररने असा काही शॉट खेळला जो पाहून खुद्द कार्गिओसलाही काही क्षणांसाठी गोष्टी कळण्यापलीकडेच होत्या. कार्गिओसच्या ड्रॉप शॉटला उत्तर देण्यासाठी म्हणून फेडरर कोर्टची बेसलाईन ओलांडून असा काही आवेगात धावत आला आणि कार्गिओसच्या दिशेने शॉट खेळला. हे पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावरही वेगळेच भाव पाहायला मिळाले होते.

वाचा : दडपणाखाली खेळण्याची कला आत्मसात करण्याची गरज!

सोशल मीडियावरही फेडररच्या या शॉटच्या चर्चा पाहायला मिळाल्या. युएस ओपनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही याविषयीचं एक ट्विट करण्यात आलं. ज्यामध्ये हा ‘शॉट ऑफ द टूर्नामेंट’ असल्याचंही त्यांनी म्हटलं. सोशल मीडियावर हे ट्विट आणि फेडररच्या अफलातून खेळाची पुन्हा एकदा चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे.