पीटीआय, नवी दिल्ली
भारताचे आघाडीचे टेनिसपटू सुमित नागल आणि ससीकुमार मुकुंद यांनी पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. नागल आणि मुकुंदच्या निर्णयामुळे भारतासमोर संघनिवडीची समस्या निर्माण झाली आहे. खेळाडूंच्या या भूमिकेबाबत भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) नाराजी व्यक्त केली असून प्रशासकीय समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात येणार आहे.
रोहन बोपण्णाच्या डेव्हिस चषक निवृत्तीनंतर भारतीय संघ या स्पर्धेत प्रथमच एखादी लढत खेळणार आहे. विशेष म्हणजे ही जागतिक गट-१ मधील लढत आहे. त्यामुळे या लढतीला फार महत्त्व आहे. नागल हा पुरुष एकेरीतील भारताचा सध्याचा सर्वोत्तम टेनिसपटू असून तो एटीपी क्रमवारीत १४१व्या स्थानी आहे. मुकुंद हा ४७७व्या स्थानावर असून तो क्रमवारीनुसार एकेरीतील भारताचा दुसरा सर्वोत्तम टेनिसपटू आहे.
हेही वाचा >>>“मला खूप वाईट..”, मोहम्मद शमीचं ऑस्ट्रेलियन स्टारच्या वादग्रस्त फोटोवर स्पष्ट उत्तर; म्हणाला, “ज्याला डोक्यावर..”
नागल आणि मुकुंद या दोघांनीही या लढतीसाठी आपली अनुपलब्धता ‘एआयटीए’ला कळवली आहे. मात्र, त्यांनी या निर्णयामागील कारण स्पष्ट केलेले नाही; परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी या लढतीत न खेळण्यामागे पाकिस्तानात जावे लागणे हा मुद्दाच नसल्याचे समजते. ‘‘पाकिस्तानने ही लढत हिरवळीवर (ग्रास कोर्ट) खेळविण्याचा निर्णय घेतला, त्या वेळीच आपण या लढतीत खेळण्यास उत्सुक नसल्याचे सुमितने संघ व्यवस्थापनाला कळवले होते. तर मुकुंदने वैयक्तिक कारणाने ही लढत खेळण्यास नकार दिला आहे,’’ अशी माहिती ‘एआयटीए’च्या सूत्रांकडून देण्यात आली.
खेळाडूंच्या निर्णयाबाबत ‘एआयटीए’ने नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘देशासाठी खेळण्याचा प्रश्न असताना खेळाडू असा विचार कसा करू शकतात? त्यांनी नकारामागचे कारण स्पष्ट करावे. आम्ही हा विषय आता प्रशासकीय समितीसमोर ठेवणार आहोत. खेळाडू आजारी किंवा दुखापतग्रस्त असेल, तर समजून घेता येते. मात्र, येथे काहीच ठोस कारण नाही. मुकुंदने तर यापूर्वी दोन वेळा देशासाठी खेळण्यास ऐन वेळी नकार दिला आहे,’’ अशी प्रतिक्रिया ‘एआयटीए’चे सचिव अनिल धुपर यांनी व्यक्त केली.
(सुमित नागल, ससीकुमार मुकुंद)