Kanga League History: क्रिकेट या खेळाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. सुरूवातीच्या काळात या खेळात इंग्लंडचं वर्चस्व होतं. पण त्यानंतर हा खेळ जगभरात पोहोचला. आता भारतीय संघ देखील क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी आहे. गेल्या काही दशकात भारताने क्रिकेटमध्ये खूप प्रगती केली आहे. भारतीय क्रिकेटला मोठं करण्यात मुंबईचा मोलाचा वाटा आहे. मुंबईने भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू दिले. त्यामुळेच मुंबईला क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं. पावसामुळे मुंबईतील वाहतूक थांबेल, पण क्रिकेट कधीच थांबत नाही. पावसाळा सुरू झाला की, मुंबईत कांगा लीग क्रिकेट स्पर्धेला सुरूवात होते. काय आहे या स्पर्धेचा इतिहास? जाणून घ्या.

मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, भारतात जेव्हा क्रिकेटची सुरूवात झाली तेव्हा पहिला सामना मुंबईत खेळवला गेला होता. मुंबईत क्रिकेटचा पहिला सामना १७२१ मध्ये खेळवला गेला होता. त्यावेळी ब्रिटिश नौदल अधिकारी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. त्यानंतर १८४७ मध्ये भारतातील पहिल्या क्रिकेट क्लबची स्थापना मुंबईत झाली. या क्लबचं नाव होतं, पारसी क्रिकेट क्लब.

कांगा लीग क्रिकेट स्पर्धेचा इतिहास

तुम्ही जर पावसाळ्यात मुंबईतील आझाद मैदान,क्रॉस मैदान, ओव्हल मैदान किंवा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर गेलात, तर तुम्हाला पांढऱ्या रंगाची जर्सी परिधान केलेले खेळाडू पावसातही क्रिकेट खेळताना दिसतील. असं काही दिसल्यास गोंधळून जाऊ नका. पावसाळ्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून दरवर्षी कांगा लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेची सुरूवात १९४८ मध्ये करण्यात आली होती. या स्पर्धेचं नाव डॉ. हॉर्मसजी मॉर्डनजी कांगा यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. डॉ. कंगा हे फक्त डॉक्टरच नव्हते तर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (त्या वेळचे बॉम्बे क्रिकेट असोसिएशन) पदाधिकारी होते.

या स्पर्धेचे आयोजन पावसाळ्यात केले जाते.मुंबईतील मुसळधार पावसामुळे मैदानावर चिखल, ओलसर गवत आणि अवघड खेळपट्टी असते. पावसाळ्यात फलंदाजी करताना फलंदाजांची चांगलीच कसोटी लागते. या स्पर्धेत गोलंदाजांची चांदी पाहायला मिळते. तर फलंदाज धावा करताना संघर्ष करताना दिसतात. पण जो फलंदाज या खेळपट्टीवर टिकून राहतो, त्याचं खूप कौतुक होतं. या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन प्रामुख्याने रविवारी केले जाते.

या स्पर्धेला अनेक दिग्गज खेळाडूंचा वारसा लाभला आहे. ज्यात सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, सुनील गावसकर, विनोद कांबळी, वसीम जाफर आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडूही आपल्या क्लबकडून कांगा लीग स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. या स्पर्धेला मुंबई क्रिकेटची शाळा असे देखील म्हटले जाते.