आयपीएलच्या १२ व्या सत्रातील अंतिम सामन्यात जेतेपदासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघामध्ये रविवारी लढत होणार आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत प्रत्येकी तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. चौथ्या जेतेपदासाठी दोन्ही संघ आज आमने-सामने येणार आहे. दोन्ही संघामध्ये याआधी झालेल्या तीन अंतिम सामन्यात दोन सामन्यात मुंबई संघाने बाजी मारली आहे. अंतिम सामन्यातील तीन अजब योगायोग आमच्या हाती आले आहेत. कदाचीत या सत्रात तसे घडेलच असे नाही. मात्र, याआधी तीन वेळा असे घडले आहे. जाणून घेऊयात काय आहेत योगायोग…

प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला जेतेपद?
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघामध्ये चौथ्यांदा अंतिम सामना होणार आहे. याआधी झालेल्या तीन सामन्यात ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली त्या संघाने चषकावर नाव कोरलं आहे. २०१० च्या अंतिम सामन्यात चेन्नईने २२ धावांनी तर २०१३ मध्ये मुंबई संघाने २३ धावांनी विजय मिळवला होता. २०१५ मध्ये मुंबईने चेन्नईचा ४१ धावांनी पराभव केला होता. ऐवढेच नाही तर २०१७ मध्ये धोनी राइजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा कर्णधार होता. त्यावेळी अंतिम सामन्यात मुंबईने रोमांचक लढतित पुणे संघाचा एका धावेनं पराभव केला होता. तर मग यंदाही जो संघ प्रथम फलंदाजी करेल तो आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरेल का?

चेन्नईला मिळणार कर्णच्या नशीबाची साथ?
लेग ब्रेक गोलंदाज कर्ण शर्माच्या संघाने अंतिम सामना खेळला तर संघाने जेतेपद मिळवल्याचा इतिहास आहे. आतापर्यंत कर्ण शर्माच्या संघाने दोन वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. यंदा कर्ण शर्मा चेन्नई संघाकडून खेळतोय. कर्ण शर्मा २०१६ मध्ये हैदराबाद संघाचा सदस्य होता. त्यावेळी हैदराबाद संघाने जेतेपदावर नाव कोरलं होते. २०१७ मध्ये कर्ण शर्माला मुंबई संघाने विकत घेतले होते. २०१७ मध्ये मुंबई संघाने पुण्याचा पराभव करत आयपीएलच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कारलं होते. यंदा कर्ण शर्मा चेन्नईच्या संघातून खेळत आहे आणि चेन्नई संघ अंतिम सामन्यात पोहचला आहे. कर्ण शर्माच्या नशीबाची साथ चेन्नईला मिळणार का?

अंकाच्या गणितात मुंबई लई भारी –
अंकाची गणना केल्यास मुंबईचे पारडे मजबूत दिसून येतेय. २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये मुंबईने आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे. तिन्ही वेळा वर्षांची संख्या विषम राहिली आहे. एक वर्षाआड मुंबईने आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे. यंदा पुन्हा विषम वर्ष….

या सर्व योगायोगाचा विचार केल्यास नशीब कोणत्या संघाला साथ देतेय तो येणारा काळ ठरवेल. मात्र, आजच्या सामन्यानंतर चेन्नई आणि मुंबई यांच्यातील एक संघ चौथ्यांदा आयपीएलचा जेतेपदावर नाव कोरेल. दोन्ही संघ संतुलित तर आहेतच शिवाय दोन्ही कर्णधारांचा कूल फॅक्टरही तेवढाच महत्वाचा मानला जातोय. त्यामुळे या सामन्यात कोणताही संघ जिंकला, तरी ‘आयपीएल’ इतिहासाचा एक अध्याय लिहिला जाणार आहे.