Mohammed Shami: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा झाल्यानंतर शमीला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. सध्या तो रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगाल संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी करून त्याने निवडकर्त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत बंगालचा पहिला सामना उत्तराखंड संघासोबत सुरू आहे. या सामन्यातील दोन्ही डावात शमीने दमदार कामगिरी केली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने १४.५ षटकात अवघ्या ३७ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने २४.४ षटकात ३८ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. दोन्ही डावात त्याने ७ गडी बाद करून आपण फिट आहोत, हे निवडकर्त्यांना दाखवून दिलं आहे.

गोलंदाजीत ७ गडी बाद करणाऱ्या शमीने फलंदाजी १० धावा देखील केल्या. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या उत्तराखंड संघाला २६५ धावा करता आल्या. प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या बंगाल संघाने पहिल्या डावात ३२३ धावा केल्या. दुसऱ्या डावात उत्तराखंड संघाला अवघ्या २१३ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे बंगाल संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १५५ धावा करायच्या आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात मोहम्मद शमीला स्थान दिलं गेलं नव्हतं. यामागचं कारण विचारलं असता, मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सांगितलं होतं की, मोहम्मद शमी पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याला संघात स्थान दिलं गेलेलं नाही. पण शमीने आता दमदार कामगिरी करून आपण पूर्णपणे फिट आहोत हे दाखवून दिलं आहे. अजित आगरकरांनी फिटनेसचं कारण दिल्यानंतर शमीने जोरदार प्रत्युत्तर देखील दिलं होतं. पण यावेळी त्याने आपल्या कामगिरीने सर्वांची बोलती बंद केली आहे. आता रणजी ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी करूनही शमीला भारतीय संघात स्थान मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.