चॅम्पियन्स करंडक २०१७ च्या अंतिम फेरीत झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना फिक्स असल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ते नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. याआधीही गुजरातमध्ये एका कार्यक्रमादरम्यान आठवले यांनी अंतिम सामन्यातल्या भारताच्या पराभवाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतर आज चक्क भारताचा कर्णधार विराट कोहली आणि युवराज सिंह यांच्यावर मॅचफिक्सिंगचे आरोप करत आठवलेंनी एका नवीन वादाला तोंड फोडलं आहे.

yuvraj singh , virat kohli

”संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा भारतीय संघ नेमका अंतिम सामन्यात कसा काय ढेपाळतो? कर्णधार विराट कोहली आणि युवराज सिंहसारखे खेळाडूही या सामन्यात जिंकण्यासाठी खेळायला उतरलेले वाटले नाहीत. एरवी शतकी खेळी करणारा विराट कोहली आणि गेल्या काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणारा युवराज सिंह या सामन्यात हरण्यासाठी खेळताना वाटत होते.” त्यामुळे हा सामना फिक्स असल्याची दाट शक्यता असल्याचं सांगत याची चौकशी करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. यापुढे जात आठवले यांनी कुंबळे-कोहली यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या पराभवामुळे भारतीय संघाने करोडो क्रिडारसिकांसह देशाचाही अपमान केल्याचं आठवले यांनी म्हणलंय.

साखळी सामन्यात पाकिस्तावर मात करणाऱ्या भारतीय संघाची अंतिम फेरीत गाठ पुन्हा एकदा पाकिस्तानसोबतच पडली होती. त्यामुळे या सामन्यातही भारत पाकिस्तानवर सहज मात करेल अशी सर्वांना आशा होती. मात्र अंतिम फेरीत सर्व फासे उलटे पडले, पाकिस्तानी संघाने भारतावर बाजी पलटवत चॅम्पियन्स करंडकावर आपलं नाव कोरलं होतं. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर जीवदान मिळालेल्या फखार झमानने पुढे शतक झळकावत मोठी धावसंख्या उभारण्यात आपला हातभार लावला होता.

रामदास आठवलेंव्यतिरीक्त अभिनेता कमाल खाननेही भारत-पाकिस्तानमधला हा सामना फिक्स असल्याचा आरोप केला होता. याचसोबत आयपीएलच्या अंतिम फेरीचा मुंबई विरुद्ध पुणे हा सामना देखील फिक्स असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या होत्या. भारतीय संघात दलितांना आरक्षण, अंतिम सामन्याच्या पराभवाची चौकशी आणि आता कोहली-युवराजवर फिक्सींगचे आरोप करत रामदास आठवले यांनी क्रिडाक्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ माजवून टाकली आहे. मात्र आठवलेंच्या या आरोपाला कोणतेही पुरावे नसल्यामुळे येत्या काही दिवसात बीसीसीआय यावर काही प्रतिक्रिया देते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.