KL Rahul Wicket, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना एजबस्टनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला, पण भारतीय फलंदाजांना हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. सलामीला आलेला केएल राहुल स्वस्तात माघारी परतला आहे.
भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालची जोडी मैदानावर आली. गेल्या सामन्यात या जोडीने दमदार सुरूवात करून दिली होती. मात्र, या सामन्यात या जोडीला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. इंग्लंडच्या धारदार गोलंदाजीवर एका बाजूने यशस्वीने जोरदार हल्लाबोल केला. यशस्वीने ३ चौकार मारले होते. तर दुसरीकडे राहुल संयमी फलंदाजी करत होता. मात्र, ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर त्याला पॅव्हेलियनची वाट धरावी लागली.
तर झाले असे की, या डावात फलंदाजी करत असताना केएल राहुलने संयम दाखवत २६ चेंडू खेळून काढले होते. त्याने एकही जोखीम घेतली नव्हती. मात्र त्याला ख्रिस वोक्सने टाकलेल्या चेंडूची गती आणि उसळीचा अंदाज घेता न आल्याने आपला विकेट गमवावा लागला. इंग्लंडकडून ९ वे षटक टाकण्यासाठी ख्रिस वोक्स गोलंदाजीला आला. या षटकातील चौथा चेंडू बॅक ऑफ लेंथ टाकला. हा चेंडू केएल राहुलने बॅटने रोखण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू बॅटचा कडा घेत खेळपट्टीवरून एक टप्पा घेत यष्टीला जाऊन धडकला. त्यामुळे केएल राहुलला अवघ्या २ धावांवर माघारी परतावं लागलं.
भारतीय संघाच्या १५० धावा पूर्ण
सुरुवातीला मोठा धक्का बसल्यानंतर, यशस्वी जैस्वाल आणि करूण नायरने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. करूण नायरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. त्याने जैस्वालसोबत मिळून अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान करूण नायरने ५० चेंडूंचा सामना करत ३१ धावांची खेळी केली.
त्यानंतर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालने मिळून संघाची धावसंख्या १५० पार पोहोचवली आहे. शुबमन गिल अर्धशतकाच्या जवळ आहे. तर यशस्वी जैस्वालकडे शतक झळकावण्याची संधी आहे.