एपी, न्यूयॉर्क: अमेरिकेने २०३१ महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सह-यजमानपदासाठी मेक्सिको, कोस्टा रिका आणि जमैका यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेच्या यजमानपदासाठी अमेरिका, मेक्सिको, कोस्टा रिका आणि जमैका या देशांनी संयुक्तपणे एकच बोली लावण्यात आली आहे. ‘फिफा’ सदस्यांच्या ३० एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या बैठकीत या एकमेव बोलीवर विचार केला जाईल.

महिला विश्वचषक स्पर्धादेखील पुरुषांच्या स्पर्धेप्रमाणे विस्तारलेली असेल. महिला स्पर्धेतही ४८ देश सहभागी होतील. पुरुषांची विश्वचषक स्पर्धा कशी संयुक्तपणे आयोजित केली जाईल, तशाच समान रचनेत महिलांची स्पर्धादेखील पार पडेल. संघ, सामन्यांची संख्या नाही, तर सुविधांच्या गुणवत्तेतही ही स्पर्धा समान अनुभव देईल, असे अमेरिकन फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षा सिंडी पार्लो कोन यांनी सांगितले. या स्पर्धेतील सामन्यांच्या आयोजनासाठी अमेरिकेतील तीसहून अधिक शहरांनी तयारी दर्शविल्याची माहितीदेखील सिंडी पार्लो कोन यांनी दिली.

अमेरिकेने यापूर्वी १९९९ मध्ये महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. तेव्हा संघांची संख्या १२ वरून १६ करण्यात आली होती आणि एकूण ३२ सामन्यांना १.२ दशलक्ष चाहत्यांची उपस्थिती होती.

अमेरिका आणि मेक्सिको फुटबॉल महासंघाने गेल्या वर्षी एप्रिलमध्येच २०२७ च्या स्पर्धेचे संयुक्त आयोजन करण्याचा विचार मागे घेतला. आम्ही २०३१ मधील स्पर्धेवर लक्ष केंद्रित करत असल्याचे कारण त्यावेळी देण्यात आले होते. तेव्हा ‘फिफा’ने २०२७ मधील स्पर्धा ब्राझीलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. अमेरिका एकट्याने २०३१ च्या स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक होता. पण, पुढे अन्य देश त्यांच्याबरोबर आले. संयुक्त आयोजन आता मूळ धरू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड यांनी २०३५ मध्ये संयुक्तपणे स्पर्धा आयोजन करण्याची तयारी दर्शविली आहे.