भारताचे ३ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताचा सिनियर पुरूष संघ, महिलांचा सिनियर संघ आणि पुरूषांचा अंडर-१९ संघही इंग्लंडमध्ये मालिका खेळत आहेत. दरम्यान भारताचा अंडर-१९ संघ सिनियर संघाचा कसोटी सामना पाहण्यासाठी पोहोचला होता. यावेळेस अंडर-१९ संघाचे कोच ह्रषिकेश कानिटकर यांनी सांगितलं की अंडर-१९ संघाची सामना पाहण्याची व्यवस्था कोणी केली होती, याचा खुलासा केला.
वैभव सूर्यवंशीसह संपूर्ण अंडर-१९ संघ शुबमन गिलचं द्विशतक झळकावल्यानंतर त्याचं उभं राहून टाळ्या वाजवून कौतुक केलं. बीसीसीआयने देखील अंडर-१९ संघाचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-१९ संघ पाच एकदिवसीय सामने आणि दोन युवा कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. आतापर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत आणि भारत २-१ ने आघाडीवर आहे.
युवा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि संघाचे प्रशिक्षक हृषीकेश कानिटकर यांच्यासह सर्व खेळाडू उपस्थित होते. सर्वांनी या अनुभवाबद्दल सांगितलं. कानिटकर म्हणाले की, सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी १९ वर्षांखालील संघाला कसोटी सामना पाहण्यासाठी जाण्याची व्यवस्था केली.
बीसीसीआयने १९ वर्षांखालील संघाच्या खेळाडूंनी शुबमन गिलची खेळी पाहताना अनुभवाचा व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये संघाचे प्रशिक्षक कानिटकर म्हणाले, “व्हीव्हीएस लक्ष्मणने यांनी हे नियोजन करण्यात भूमिका बजावली. त्यांनी सांगितले की तिथे जाऊन सामना पाहणं संघासाठी चांगलं असेल. कसोटी सामना पाहायला जाणं हे एका उदयोन्मुख क्रिकेटपटूसाठी निश्चितच खास प्रसंग असतो. मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक चेंडू चौकार आणि षटकार मारण्यासाठी नसतो. शुबमनप्रमाणेच तुम्ही प्रभावी फलंदाजी करत धावा काढू शकता. आम्ही परत गेल्यावर एक सेशन घेऊ आणि सर्वांना विचारू की ते काय शिकले.”
वैभव सूर्यवंशी शुबमन गिलच्या द्विशतकाबाबत म्हणाला, “मला खूप छान वाटतंय. मी पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहत आहे आणि खेळ कसा पुढे सरकतो ते मी पाहत आहे. आम्ही सर्वजण सामना पाहण्यासाठी आलो आहोत. आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आहे. शुभमन गिल आमच्यासाठी एक आदर्श आहे. आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असत.”
भारताच्या अंडर-१९ संघाचा पुढील सामना उद्या ५ जुलै रोजी होणार आहे. भारताने पुढील सामना जिंकल्यास मालिका आपल्या नावे करू शकतो.