भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना त्यांनी संघामध्ये अशा प्रकारची मानसिकता निर्माण केली की ज्यामध्ये पराभव हा पर्याय म्हणूनही उरत नसल्याचे सांगितले. ‘सीएट’ क्रिकेट मानांकन पुरस्कार सोहळ्यादरम्यान वरुण चक्रवर्तीने माध्यमांशी संवाद साधताना प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या दृष्टिकोनाबद्दल स्पष्ट भाष्य केले. ‘‘आयपीएल’मधून मला गंभीर यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव होता. त्यामुळे मला त्यांची मार्गदर्शन शैली नवी नाही. त्यांनी संघामध्ये एक प्रकारची दृढनिश्चयी मानसिकता निर्माण केली आहे. ज्यामुळे संघासमोर पराभवाचा पर्यायच उरत नाही. तुम्हाला फक्त सर्वोत्तम खेळ दाखवावा लागतो आणि सर्वस्व पणाला लावावे लागते,’’ असे चक्रवर्ती म्हणाला.

प्रसारमाध्यमांनी मला गूढ फिरकी गोलंदाज अशी उपमा दिली आहे ती आपल्याला मान्य नाही, असेही वरुण म्हणाला. ‘‘मी कधीही स्वत:ला गूढ गोलंदाज म्हटलेले नाही. माध्यमांनी मला ही उपमा दिली आहे. माझ्याकडे प्रत्येक चेंडू एकाच ग्रीपने आणि एकाच पद्धतीने सोडण्याची क्षमता आहे. यानंतरही मला गूढ म्हणायचे असेल, तर ते ठीक आहे,’’ असे वरुणने सांगितले.आशिया चषक स्पर्धेतील विजेतेपदावर भाष्य करताना वरुणने संघ केवळ अपराजित राहण्यावर लक्ष केंद्रित करत होता. मैदानाबाहेर काय सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष करण्यावर भर राहिल्याचे स्पष्ट केले. ‘‘इतरांबद्दल माहीत नाही. पण, आम्ही जेव्हा आशिया चषक स्पर्धेसाठी पोहोचलो, तेव्हा आमचे प्राथमिक ध्येय विजेतेपदाचेच होते. अन्य गोष्टींकडे आम्ही बघतही नव्हतो. विजेतेपद, प्रत्येक लढत जिंकणे आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भक्कम तयारी करणे हेच आमचे उद्दिष्ट होते,’’ असे चक्रवर्ती म्हणाला.

आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडू समाजमाध्यमांवर चांगलेच सक्रिय असल्याचे दिसून आले. मात्र, वरुणने हे मान्य करण्यास नकार दिला. संघातील प्रत्येक खेळाडू समाजमाध्यमापासून दूर होता. केवळ सामन्यानंतर ते त्याचा उपयोग करत होते. आम्ही परदेशात होतो. त्यामुळे भारतात काय सुरू होते हे आम्हाला समजत नव्हते. संयुक्त अरब अमिरातीत मात्र सर्व शांत होते, असे वरुणने सांगितले.

कुलदीप यादवच्या गोलंदाजीचे कौतुक करताना वरुण म्हणाला, ‘‘त्याच्यासोबत गोलंदाजी करणे हा एक सुंदर अनुभव आहे. आम्ही एकमेकांना पूरक आहोत. कारण मी ताशी ९५ कि.मी., तर कुलदीप ८५ कि.मी. वेगाने गोलंदाजी करतो. त्याच्याकडे अधिक फिरकी आहे, तर माझ्याकडे अधिक वेग आणि उसळी आहे. यामुळेच आम्ही एकत्र कामगिरी करताना यशस्वी झालो.’’

चक्रवर्ती आणखी काय म्हणाला…

प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला.

माझी भूमिका गडी बाद करणे आणि यष्ट्यांवर गोलंदाजी करणे. यासाठी दोघांनी मला स्वातंत्र्य दिले.

एकदिवसीय सामने खेळण्यासाठी फलंदाजीत सुधारणा करण्याची आवश्यकता.

यासाठी गंभीर यांच्याकडून देशांतर्गत हंगामात अधिक वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सल्ला.