भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची सलग दोन क्रिकेट मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध झालेली टी २० आणि एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकल्या आहेत. भारतीय संघाला आता २२ जुलैपासून वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय आणि टी २० मालिका खेळायची आहे. मात्र, त्यापूर्वी दोन-तीन दिवस खेळाडूंना सुट्टी देण्यात आली आहे. मिळालेल्या सुट्टीमध्ये भारतीय संघातील खेळाडू आपापसात खूप मस्ती करताना दिसत आहेत. सूर्यकुमार यादव आणि संघातील इतर काही खेळाडूंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. ‘कंट्रोल उदय’ या कॅप्शनखाली हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तो ईशान किशन, शुबमन गिल आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. हे सर्वजण ‘वेलकम’ याची चित्रपटातील नाना पाटेकरच्या डायलॉगवर अभिनय करताना दिसत आहेत. शुबमन गिल ईशान किशनच्या पाठीवर बसलेला दिसत आहे. तर, भुवनेश्वर कुमार नाना पाटेकरचा अभिनय करणाऱ्या सूर्यकुमारची बडबड ऐकत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओला अवघ्या काही तासांत लाखो लोकांनी लाईक केले आहे. आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनेही त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून “कंट्रोल दादा, कंट्रोल” अशी कमेंट केली आहे. सूर्यकुमार यादव सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा मजेदार व्हिडीओ शेअर करतो. मागच्या वर्षी क्वारंटाईन दरम्यान त्याने पृथ्वी शॉसोबत बनवलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.