दुबई : भारताचा कर्णधार आणि फलंदाजीतील आधारस्तंभ विराट कोहली याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २०१९ सालच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. कोहली वगळता कसोटी आणि एकदिवसीय संघात भारताच्या चार खेळाडूंनी स्थान मिळवले आहे.

कसोटी संघात मयांक अगरवाल आणि कोहलीचा, तर एकदिवसीय संघात कोहलीसह रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांचा समावेश आहे.

२०१९ मधील आयसीसीचे संघ

* एकदिवसीय : रोहित शर्मा, शाय होप, विराट कोहली (कर्णधार), बाबर आझम, केन विल्यम्सन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

* कसोटी : मयांक अगरवाल, टॉम लॅथम, मार्नस लबूशेन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वाॅटलिंग, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नील वाॅग्नर, नॅथन लायन.

पुरस्कार मिळाल्याचे आश्चर्य – कोहली

गेली अनेक वर्षे मी वाईट गोष्टींमुळे सतत चर्चेत असायचो, पण आता आयसीसीचा खेळभावना पुरस्कार मला मिळाल्याने मी चकित झालो आहे, अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहलीने आश्चर्य व्यक्त केले.

विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्टीव्ह स्मिथची चाहत्यांकडून हुर्यो उडवण्यात येत होती; पण फलंदाजीला उतरलेल्या कोहलीला चाहत्यांचे हे वागणे पटले नाही. त्यामुळे खेळाडूला चिथावण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन द्या, अशा कृतीद्वारे कोहलीने चाहत्यांना समज दिली होती. कोहलीचा हा व्हिडीयो आयसीसीने समाजमाध्यमांवर टाकल्यानंतर त्याच्या या कृतीबद्दल विराटचे कौतुक होत होते.

स्मिथला पाठिंबा देण्यामागचे कारण कोहलीने स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘‘त्या वेळेला मी स्मिथची परिस्थिती समजू शकत होतो. त्याच्या या परिस्थितीचा फायदा चाहत्यांनी उठवण्याची गरज नव्हती. चाहत्यांचे हे वागणे स्वीकारण्याजोगे नव्हते. कोणत्याही खेळात चाहत्यांनी खेळाडूचे मनोधैर्य खच्ची करण्याऐवजी त्याला पाठिंबा देणे आवश्यक असते. चाहत्यांची तोंडे बंद करत मीसुद्धा स्मिथला पाठिंबा दिला.’’