Virat Kohli post for Cristiano Ronaldo: मोरोक्कोविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने पोर्तुगालचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या पराभवाबरोबरच आता ख्रिस्तियानो रोनाल्डो कधीच विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होणार नाही की काय अशी शंका त्याच्या चाहत्यांना वाटू लागली आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोची ही निवृत्तीपूर्वीची शेवटची विश्वचषक स्पर्धा असल्याची चर्चा विश्वचषक सुरु होण्याच्या पूर्वीपासूनच होती. मात्र संघ स्पर्धेतून अनपेक्षितरित्या बाहेर पडल्याने चाहत्यांना दु:ख अनावर झालं आहे. विशेष म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचाही समावेश असून पोर्तुगालचा संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर विराटने रोनाल्डोसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

आकाशाकडे हात करुन उभ्या असलेल्या रोनाल्डोचा फोटो पोस्ट करत विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रोनाल्डोने या खेळासाठी आणि चाहत्यांसाठी जे काही केलं आहे त्याचं मोजमाप एखाद्या चषकाने किंवा जेतेपदाने करता येणार नाही असं म्हणत विराटने या पोर्तुगीज खेळाडूचं श्रेष्ठत्व अधोरेखित केलं आहे. विराटने भावनिक शब्दांमध्ये रोनाल्डोचं कौतुक करताना त्यांच्याकडे असलेलं कौशल्य हे दैवी देणगी असल्याचंही म्हटलं आहे.

“या खेळासाठी आणि खेळावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी तू जे काही केलं आहे ते कोणताही चषक किंवा जेतेपद (न मिळवण्यापेक्षा) फार मोठं असून ते कोणीही तुझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. तू लोकांवर पाडलेला प्रभाव तुझ्याकडून कोणालाही हिरावून घेता येणार नाही, तुला खेळताना पाहून मला आणि माझ्यासारख्या जगभरातील चाहत्यांना जे काही वाटतं ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ही देवाची देणगी आहे,” असं म्हणत विराटने आपल्या रोनाल्डोबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नक्की वाचा >> FIFA World Cup मध्ये नवा वाद! ‘या’ देशाच्या खेळाडूंनी मैदानावर फडकावला पॅलेस्टाइनचा झेंडा; विजयानंतर ‘फ्री पॅलेस्टाइन’ची मागणी

दुसऱ्या ट्विटमध्ये विराटने रोनाल्डो हा अनेक खेळाडूंसाठी प्रेकरणास्थान असल्याचं म्हटलं आहे. “प्रत्येक वेळेस जीव ओतून खेळतोस तू. तुझ्यासारख्या व्यक्तीला मिळालेली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तू कष्ट घेणाऱ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहेस. तुझा निश्चय खरोखरच कौतुकास्पद आहे. तू कोणत्याही खेळाडूसाठी प्रेरणास्थान आहेस. माझ्यासाठी तूच सर्वकालीन महान खेळाडू आहेस,” असं विराटने दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: पोर्तुगालविरुद्ध मोरोक्कोच्या यशाचे गमक काय?

उपांत्यपूर्व फेरीतील ‘करो या मरो’च्या सामन्यातही तारांकित आघाडीपटू आणि कर्णधार असलेल्या रोनाल्डोला अंतिम ११ मधून वगळण्याचा निर्णय पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नाडो सांतोस यांनी घेतला. पोर्तुगालचा संघ पराभूत झाल्याने सांतोस यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र रोनाल्डोला संघातून वगळल्याची खंत नसल्याचे सांतोस सामन्यानंतर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘रोनाल्डोला वगळण्याच्या निर्णयाची मला खंत वाटत नाही. मी संघाच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेतला. उपउपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडविरुद्ध रोनाल्डोविना आमचा संघ  चांगला खेळला. त्यामुळे मोरोक्कोविरुद्ध तोच संघ कायम ठेवला. परंतु, रोनाल्डोला वगळण्याचा निर्णय हा धोरणाचा भाग होता. संघाच्या हितासाठी कठीण निर्णय घ्यावे लागतात. रोनाल्डो उत्कृष्ट खेळाडू आहे. एका सामन्यात संघातून वगळल्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही,’’ असे सांतोस म्हणाले.