भारतीय क्रिकेट संघाचे दोन माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यातील नाते सर्वश्रुत आहे. ही जोडी मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर नेहमीच सुपरहिट ठरली आहे. विराटने आता एमएस धोनीबद्दल असे काही लिहिले आहे, ज्याने अचानक धोनीला ट्रेंडमध्ये आणले आहे. २१ नोव्हेंबर (सोमवार) रोजी विराटने त्याच्या इंस्टा स्टोरीवर माजी कर्णधाराच्या फोटोसह एक विशेष संदेश लिहिला, जो व्हायरल झाला आणि माही ट्विटरवर ट्रेंड करू लागला.
विराट आणि धोनीच्या जोडीने बराच वेळ मैदानावर एकसोबत घालवला आहे. या दोघांनी प्रतिस्पर्धी संघांचे होश उडवले आहेत. कॅप्टन कूल धोनीच्या निवृत्तीनंतर रन मशीन कोहलीला त्याची उणीव जाणवते, हे सर्वांनाच माहीत आहे. कशा ना कशाच्या निमित्ताने कोहली नेहमीच धोनीचा उल्लेख करत असतो.
सोमवारी, त्याने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये धोनीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. खरंतर धोनीचा पाण्याच्या बाटलीवरचा फोटो पाहिल्यानंतर, कोहली तो पोस्ट केल्याशिवाय राहू शकला नाही. इंस्टा स्टोरी पोस्ट करताना विराट कोहलीने धोनीबद्दल लिहिले, “तो सर्वत्र उपस्थित असतो, अगदी पाण्याच्या बाटलीवरही.” कोहलीने ही स्टोरी पोस्ट करताच ती काही वेळातच व्हायरल झाली. यानंतर लोकांनी धोनीला ट्विटरवर ट्रेंड केले.
विशेष म्हणजे २०२२ च्या टी२० विश्वचषकात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर पुढील महिन्यात टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्यावर विराट कोहली खेळताना दिसणार आहे. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघ ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.