राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणवर भारताच्या आयर्लंड दौऱ्याच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. याशिवाय, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील प्रशिक्षक सितांशु कोटक, साईराज बहुतुले आणि मुनीश बाली हेदेखील लक्ष्मणला सहकार्य करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली पाच सामन्यांची टी २० मालिका संपल्यानंतर भारत आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ तिथे २६ आणि २८ जून रोजी दोन टी २० सामने खेळेल. नेमके त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर वरिष्ठ प्रशिक्षण चमू कसोटी संघासह इंग्लंडला रवाना होणार आहे.

सितांशु कोटक यांनी यापूर्वीही भारत अ संघासोबत काम केलेले आहे. आयर्लंड दौऱ्यात ते भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक असतील. तर, बाली आणि बहुतुले यांच्याकडे अनुक्रमे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे दोघेही या वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या एकोणीस वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होते. बाली, कोटक आणि बहुतुले हे त्रिकूट सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणाऱ्या संघासोबत आहे.

हेही वाचा – IND vs SA 3rd T20 : भारतासाठी ‘करो या मरो’ची स्थिती, विशाखापट्टणममध्ये रंगणार तिसरा टी २० सामना

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “वरिष्ठ प्रशिक्षक चमू इंग्लंड दौऱ्यावर गेल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये (राजकोट आणि बेंगळुरू) बाली, कोटक आणि बहुतुले हे राष्ट्रीय टी २० संघाची जबाबदारी सांभाळतील.” आयर्लंड मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. पण, हा छोटा दौरा भारताच्या इंग्लंड दौऱ्याच्यावेळीच होणार आहे.

हेही वाचा – दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारताचा ‘गोल्डन बॉय’ मैदानावर उतरण्यास सज्ज

भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर असून मालिकेतील पाचवा सामना १ जुलैपासून होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय कसोटी संघ २४ ते २७ जून दरम्यान लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यावेळी भारतीय टी २० संघ आयर्लंडविरुद्ध दोन सामने खेळेल. त्यानंतर, इंग्लंड दौऱ्यात खेळवल्या जाणार्‍या मर्यादित षटकांच्या मालिकेत मजबूत भारतीय संघ मैदानात उतरेल. ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत तीन एकदिवसीय आणि तितक्याच टी २० सामन्यांचा समावेश असेल.